गोल पोस्ट महाराष्ट्र उप मुख्यमंत्र्यांच्या दारात मराठा समाजाचे ढोल बजाओ आंदोलन

उप मुख्यमंत्र्यांच्या दारात मराठा समाजाचे ढोल बजाओ आंदोलन

बारामती,२२ सप्टेंबर २०२० :मराठा आरक्षण प्रश्नाबाबत आक्रमक झालेला मराठा क्रांती मोर्चा आता थेट बारामती येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ढोल बजाओ आंदोलन करणार आहे. पवार यांच्या भिगवण रोडवरील सहयोग सोसायटीतील निवासस्थानासमोर शनिवार (दि. २६) सकाळी ९ ते ११ या वेळेत मराठा समाज ढोल बजाओ आंदोलन करणार आहे.

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न राज्यात चांगलाच चिघळत असून आता मराठा समाजाच्या नेत्यांना व पक्ष प्रमुखांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यभर मराठा समाजाच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत. मराठा आरक्षणाला मिळालेली ही स्थगिती राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आली आहे. ही स्थगिती उठेपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यापूर्वी देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांच्या निवासस्थानासमोर शहर आणि तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन केले जाईल.

मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात, आरक्षणाच्या मागणीसाठी बारामतीचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचे क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले आहे. यावेळी सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यासाठी आवाहन देखील करण्यात आले.

यामध्ये सोशल डिस्टंन्सींग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अत्यावश्यक आहे. समाजावर अन्याय होत आहे. त्यामुळे
कायदा व सुव्यवस्था पाळण्याबरोबरच स्वत:ची व सामाजिक स्वास्थ्याची जबाबदारी घेत आंदोलन करण्यात येणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

दरम्यान बारामतीमध्ये महायुतीच्या सत्ता काळात यापूर्वी मराठा क्रांती
मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग निवासस्थानासमोर ९ आॅगस्ट २०१८ रोजी आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये अजित पवार यांनी देखील त्यावेळी सहभाग घेतला होता. आता अजित पवार हे सत्ताधारी असून राज्यातील क्रमांक दोनच्या पदाची सुत्रे त्यांच्या हाती आहेत. आता त्यांच्याच निवासस्थानासमोरच आंदोलन होणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल यादव.

error: Content is protected !!
Exit mobile version