बीएड प्रवेशाचा नवा विक्रम शिक्षक भरतीची प्रतीक्षा!

राज्यात पदवी शिक्षणशास्त्र (बीएड) अभ्यासक्रमाच्या प्रवेशाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे! सीईटी (CET) कक्षाने राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेतून तब्बल ९२.३१ टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. विशेष म्हणजे, या प्रवेशांमध्ये मुलींनी बाजी मारली असून, त्यांची संख्या ७३.०७ टक्के इतकी आहे, जो मागील तीन वर्षांतील कल कायम ठेवणारा आहे.

राज्यभरात एकूण ४८३ बीएड महाविद्यालये असून, त्यांची प्रवेश क्षमता ३६,६९८ आहे. यावर्षी ३३,८७७ जागांवर प्रवेश निश्चित झाले असून, केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत (CAP) केवळ १,३८० जागा (४.४७%) रिक्त राहिल्या आहेत. २०२०-२१ मध्ये ८७.७३%, २०२१-२२ मध्ये ९०.७६% आणि आता ९२.३१% प्रवेशांमुळे शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची वाढती लोकप्रियता सिद्ध होते.

एकीकडे बीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे शिक्षण पूर्ण केलेल्या हजारो उमेदवारांचे लक्ष मात्र राज्यभरातील शिक्षक भरतीच्या जाहिरातींकडे लागले आहे. शिक्षक भरती होत नसल्याने अनेक बीएड धारक शिक्षकांचे भविष्य अंधारात आहे. पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघाचे सचिव गणेश काळे यांनी या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. खासगी शाळांमध्ये ४ ते ५ हजार रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याने हे शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय नैराश्यात जगत आहेत.

शिक्षणासाठी केलेल्या खर्चाची परतफेड होईल की नाही, याची शाश्वती नसल्यामुळे सरकारने या शिक्षकांच्या प्रश्नाचा प्राधान्याने विचार करून तातडीने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे