पुरंदर १२ ऑक्टोबर २०२० : पुरंदर तालुक्यातील पत्रकारांना मार्तंड देवसंस्थानाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये पत्रकार, पोलीस व शासकीय कर्मचार्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी सुद्धा राखीव बेडची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मार्तंड देव संस्थानाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे .
मार्तंड देवासंस्थानाने कोविड केअर सेंटर मध्ये पत्रकारांसाठी राखीव बेड ठेवल्याबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघ व जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आज देवस्थानाला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य बाळासाहेब काळे यांच्या हस्ते आभाराचे पत्र देण्यात आले. केवळ पत्रकाराच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सद्धा येथे राखीव बेड उपलब्द ठेवण्यात आल्याची माहिती संदीप जगताप यांनी दिली.
त्याच बरोबर कोरोना काळात पुरंदर तालुक्यातील पत्रकारांनी केलेल्या कामाबद्दल पत्रकारांचे आभार मानले.यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य दादाराव आढाव पुरंदर तालुका पत्रकार संधाचे माजी अध्यक्ष प्रकाश फाळके,जेष्ठ पत्रकार ए.टी.माने ,तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे ,कार्यकारिणी सदस्य भरत निगडे, निलेश जगताप,आसिफ मुजावर, देवस्थानाचे विस्वस्थ पंकज निकोडे आदी उपस्थित होते.जगताप बोलताना पुढे म्हणाले की ,पत्रकाराचे काम हे इतर शासकीय विभाग पेक्षा वेगळे आहे . त्याला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी बातमीसाठी पोहचावे लागते. त्यामुळे त्याचा लोकांशी जास्त संपर्क येतो आणी त्यातून त्यांना कोरोना संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे.
त्याच बरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा यामुळे कोरोन संसर्ग होण्याचा धोका आहे. म्हणूनच पत्रकारांबरोबरच त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी सुद्धा आम्ही राखीव बेडची व्यवस्था केली आहे. त्याच बरोबर पोलीस व प्रशासनातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील लोकांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी देवस्थानच्या १०० रुग्ण क्षमतेच्या कोविड केअर सेंटर मध्ये आम्ही आणखी ३० बेडची वाढ करून ती पत्रकार , प्रशासनातील सेवक व त्यांच्या परिवारातील लोकांसाठी राखीव ठेवले आहेत.
एकतर पत्रकारांना कोरोना होऊच नये अशी प्रार्थना मी खंडोबाला करतो.असे म्हणत त्यातून कोरोना झालाच तर देवस्थान पत्रकारांच्या सेवेला असेल.अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.पुरंदर तालुका पत्रकार संघाच्यावतीने भरत निगडे यांनी देवसंस्थानाचे आभार मानले. देवस्थानाने कोरोनाच्या काळात रुग्णवाहिका सेवा लोकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष सुनील लोणकर यांनी आभार मानले व देवसंस्थानाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी