बीड, ३० जुलै २०२३ : बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका शाळेतील शिक्षिका आणि खिचडी शिजवणारी महिला या दोघींमध्ये होणाऱ्या भांडणाचा हा व्हिडीओ असून, यात त्या अक्षरशः एकमेकींचे केस ओढताना पाहायला मिळत आहे. जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेतील हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. दर्जेदार आहार देत नसल्याचा जाब महिला शिक्षिकेने विचारल्यावर खिचडी शिजवणाऱ्या महिलेने ही मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जोड हिंगणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या वर्गात अंदाजे ६० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे शासनाकडून या मुलांना शालेय पोषण आहार दिला जातो. पण, येथील विद्यार्थ्यांना खिचडी शिजवणाऱ्या महिलेकडून दर्जेदार आहार दिला जात नसल्याचा आरोप आहे. हा सर्व प्रकार नेहमीचाच झाल्याने येथील एका महिला शिक्षिकेने शनिवारी खिचडी शिजवणाऱ्या महिलेस विद्यार्थ्यांना पोट भरुन पोषण आहार देण्याची मागणी केली.याचा संबंधित महिलेला राग आला. त्यामुळे खिचडी शिजवणाऱ्या महिलेने या शिक्षिकेसोबत वाद घालायला सुरुवात केली.
या महिलेने शिक्षिकेसोबत वाद घातल्यावर थेट हाणामारी सुरु केली. वाद एवढा विकोपाला गेला की या दोघींनी एकमेकांचे केस धरले. तसेच मारहाण देखील सुरु केली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर महिला त्यांचा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करत होत्या, मात्र दोघीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. दोन्ही हातांनी केस पकडून एकमेकींना लाथा मारत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. शेवटी इतर महिलांनी मध्यस्थी करत त्यांना बाजूला केले.
दरम्यान, यावेळी उपस्थित असलेल्या काही गावकऱ्यांनी हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.शालेय पोषण आहारावरून झालेल्या मारहाण प्रकरणी प्रशासनाकडून दखल घेतली जाणार का? आणि यावर काही कारवाई होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर










































