नवी दिल्ली, 29 जानेवारी 2022: अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागाराची नियुक्ती केलीय. यावेळी डॉ.व्ही.अनंत नागेश्वरन यांना ही जबाबदारी देण्यात आलीय. त्यांनी तात्काळ प्रभावानं देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आहे.
नागेश्वरन यांची नियुक्ती अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा सरकार पुढील आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. आर्थिक आढावा त्याच दिवशी संसदेत मांडला जाणार आहे. तर 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करतील.
17 डिसेंबरपासून रिक्त होतं पद
माजी मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून अध्यापनावर परतल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) म्हणून त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी संपला.
नागेश्वरन यांच्याशिवाय मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सन्याल, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक पामी दुआ, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या महासंचालक पूनम गुप्ता यांच्या नावांचाही नियुक्तीसाठी विचार करण्यात आला.
पीएम मोदींचे सल्लागार
अनंथा नागेश्वरन हे 2019 ते 2021 पर्यंत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य आहेत. याशिवाय त्यांनी लेखक, शिक्षक, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका साकारल्या आहेत. ते भारतातील प्रसिद्ध बिझनेस स्कूल आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आहेत. सिंगापूरच्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते शिक्षकही राहिले आहेत.
आयआयएम अहमदाबादमधून घेतलं शिक्षण
ते IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन होते. याशिवाय ते क्रे विद्यापीठात अर्थशास्त्राचे व्हिजिटिंग प्रोफेसरही राहिले आहेत. अनंत नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM-A) मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा केलाय. याशिवाय त्यांनी मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवीही घेतलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे