पाटणा, १० नोव्हेंबर २०२०: बिहारमधील विधानसभा निवडणुकीची मंगळवारी म्हणजेच आज मतमोजणी होणार असून, मतमोजणीची प्रक्रिया सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असून, अख्ख्या देशाचं या निवडणुकीकडं लक्ष आहे. या सर्व महत्त्वपूर्ण घडामोडीत राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री घोषित करत पोस्टर्समधून शुभेच्छा दिल्या आहेत. याचं कारण असं आहे की, तेजस्वी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त हे पोस्टर लावले गेले होते ज्यात कार्यकर्त्यांनी लगोलग बिहार मुख्यमंत्री पदाची भविष्यवाणी देखील करून टाकली.
आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता तेजस्वी यादव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याच्या देखील सूचना दिल्या. तसंच निकाल काहीही असो कोणतीही गडबड करू नये असं देखील सांगितलं. यासंबंधी त्यांनी एक ट्वीटदेखील केलं आहे. यात त्यांनी लिहलं की, ‘आरजेडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा, १० नोव्हेंबरला निवडणुका निकाल काहीही असला तरी, तो पूर्ण संयम, साधेपणा आणि सौजन्याने स्वीकारला जाणं आवश्यक आहे. फटाकेबाजी, आनंदात गोळीबार करणं, प्रतिस्पर्धी किंवा त्यांच्या समर्थकांशी असभ्य वर्तन करणं कोणत्याही किंमतीत स्वीकारलं जाणार नाही.’
याचप्रमाणं आरजेडीनंही एक ट्वीट केलं आहे. ‘तेजस्वी यादव यांनी त्यांचा वाढदिवस साधेपणानं साजरा करण्याच्या निर्णय घेतला आहे. याचा आदर करत सर्व हितचिंतक आणि समर्थकांना घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, १० तारखेला मतमोजणीसाठी क्षेत्रात जागरूक रहा.’ पण पक्षाच्या या सूचनेनंतरही तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी हजेरी लावून वाढदिवसानिमित्त मोठी गर्दी केली यावेळी.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे