दुसऱ्या सामन्याआधीच भारतीय संघाला झटका, शमी खेळण्याची शक्यता कमी

ऑस्ट्रेलिया, २० डिसेंबर २०२०: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यांमध्ये खेळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. एडिलेड टेस्ट मधील काल खेळायला गेलेल्या तिसऱ्या दिवसातील सामन्यात फलंदाजी करत असताना मोहम्मद शमी याला हाताला दुखापत झाली. त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सामन्यातून रिटायर हर्ट व्हावे लागले. यानंतर तो फिल्डिंग करण्यासाठी देखील मैदानात उतरला नाही. सामना संपल्यानंतर विराट कोहलीने देखील त्याबाबत विधान केले होते.

विराट कोहलीने आपल्या निवेदनात म्हटले की’ ‘मोहम्मद शमी याला कितपत दुखापत झाली आहे याबाबत अजून काहीही स्पष्ट समजलेले नाही. त्याला स्कॅन करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. या दुखापतीमुळे त्याला भरपूर वेदना होत होत्या या कारणाने तो आपला हात देखील हलवू शकत नव्हता. आम्हाला लवकरच याबाबत समजेल की त्याच्या हाताला कितपत दुखापत झाली आहे.’

काल खेळत असलेल्या सामन्यात मोहम्मद शमी जेव्हा फलंदाजी करण्यासाठी आला होता तेव्हा भारतीय संघाने केवळ ३१ धावा केल्या होत्या व आपले नऊ गडी गमावले होते. पेट कमिंस याच्या चेंडूवर मोहम्मद शमी याच्या हाताला दुखापत झाली ज्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होती. डॉक्टरांनी मैदानावर येऊन त्याच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र, कोणताही फायदा झाला नाही. यानंतर मोहम्मद शमी याला मैदान सोडणे भाग पडले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत भारतीय संघ आधीपासूनच अडचणींचा सामना करत आहे. आपल्या स्टार खेळाडू बाबत काही ना काही समस्या भारतीय संघाला भेडसावत आहेत. महत्त्वाचं म्हणजे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा देखील आपल्या दुखापतीमुळे या दौऱ्यामध्ये सामील झालेला नाही. त्याचबरोबर रवींद्र जडेजा देखील आपल्या दुखापतीमुळे या टेस्टमधील पहिला सामना खेळू शकला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा