अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, आणखी १४ आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ

मुंबई, ३ जुलै २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार होणार आहे. १७ जुलैपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नाराज आमदारांची तसेच भाजपच्या वरिष्ठ आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी शिंदे गटाच्या सहा आणि भाजच्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या ९-९ आमदारांना मंत्रपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये मंत्र्यांची एकूण संख्या ३० झाली होती. त्यामुळे रिक्त पदावर आपलयाला संधी मिळावी यासाठी अनेक आमदारांनी फिल्डिंग लावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अनेक दिवस रखडला होता. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आणि त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय.

या बैठकीत शिंदे गटातील आमदार आणि भाजपचे आमदार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याची तयारी करण्यात आली होती. त्यानंतर सकाळीच दोन्ही पक्षांनी काही महत्त्वाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.

भाजपकडून जयकुमार रावल, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, देवयानी फरांदे, नितेश राणे यांची नावे चर्चेत आहेत. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात १४आमदार शपथ घेणार आहेत. या आमदारांनाही कालच्या शपथविधी मध्ये मंत्रपदाची शपथ देण्यात येणार होती. मात्र, त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही. त्यामुळे येत्या १० जुलैला उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा