वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या थेट कर्जाच्या जाचक अटींमुळे लाभार्थी योजनेपासून राहणार वंचित

जालना, ता. १५ मार्च २०२३ : वसंतराव नाईक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजना (ता. एक लाख रुपये) स्वरूपाचे कर्ज या महामंडळाकडून गरजू नागरिकांना देण्यात येत असते; मात्र या कर्ज योजनेमध्ये लाभार्थींना किचकट अटींमुळे या योजनेचा लाभ मिळत नसल्याने गोर सेना, बंजारा ब्रिगेड, बंजारा युवा सेना; तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने सोमवारी (ता. १३ मार्च) मा. जिल्हाधिकारी जालना यांना एका निवेदनद्वारे या कर्ज योजनेमध्ये लादण्यात आलेल्या किचकट अटी रद्द करून पूर्वी ज्याप्रमाणे हे कर्ज देण्यात येत होते. त्याचप्रमाणे थेट कर्जाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे रास्ता रोको, तसेच ताला ठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा या दोन संघटना व मनसे पक्षाच्या वतीने देण्यात आल्याचे सांगितले आहे.

या थेट कर्ज (१ लाख रुपये) योजनेमध्ये गेल्या सात महिन्यांआधी थेट कर्ज योजनेचे फॉर्म वाटप करण्यात आले होते. यामध्ये ४५६ जण या योजनेमध्ये लाभार्थी झाले आहेत; मात्र या योजनेमधील बोजापत्रक वह इतर जाचक अटी रद्द कराव्यात आणि मागीलप्रमाणे ॲग्रीमेंट पद्धतीने कर्ज वाटप करावे.

कर्ज योजनेमध्ये पात्र लाभार्थी ४५६ असून यापैकी फक्त ४० ते ५० लाभार्थी जमीनधारक आहेत. बाकी लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत. पात्र झालेल्या लाभार्थींना कुठलीही अट न टाकता सर्वसाधारण लाभार्थींना थेट कर्जयोजना १ लाखाचे वाटप करावे; तसेच या लाभार्थींना या योजनेपासून वंचित ठेवू नये, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

या योजनेसाठी पुढीलप्रमाणे किचकट अटी, नियम लादण्यात आले आहेत :-
१) सातबारावर बोजा चढविणे
२) ४८ चेक देणे
३) जामीनदाराचे बाँड व शपथपत्र, चेक देणे
४) १८ पक्के जीएसटी कपात करून देणे.
या किचकट अटींमुळे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत.

यावेळी जिलहाधिकारी कार्यालयात निवेदन देताना
श्याम राठोड (जिल्हाध्यक्ष, गोर सेना जालना), अर्जुन कणसे (उपजिल्हाध्यक्ष, मनसे, जालना), बाळू जाधव (शहराध्यक्ष, मनसे, जालना), अमोल राठोड (उपजिल्हाध्यक्ष, बंजारा ब्रिगेड जालना), सचिन राठोड (जिल्हाध्यक्ष, बंजारा युवा सेना, जालना); तसेच या योजनेतील लाभार्थी रघू पवार, संजय राठोड, गजानन राठोड, मच्छिंद्र चव्हाण, शिवाजी राठोड यांच्यासह अनेक लाभार्थी यावेळी उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा