शाहिरी पोवाड्यातून दिला बेटी बचाव, बेटी पढाव चा संदेश

जळगाव, २० फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या जनजागृती अभियानाला आज नगरदेवळा तालुका पाचोरा येथे प्रारंभ करण्यात आला. सरदार एस. के. पवार महाविद्यालयात खानदेश लोकरंग फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून भ्रूणहत्या नित्याची घडे, म्हणून हो पुढे, भविष्यात कोडे उद्भवतील सांगतो वर्तमान, बऱ्याच मुलींचे घटले प्रमाण, उणिव वधूची करेल हैराण, जी जी जी असा दमदार आशय असलेल्या शाहिरी पोवाडे व लोकगीतांच्या माध्यमातून मुली वाचवा मुली, मुली शिकवा हा प्रभावी संदेश खानदेश लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध शाहीर शिवाजीराव पाटील यांनी आपल्या पहाडी आवाजातून विद्यार्थ्यांसमोर व ग्रामस्थांसमोर प्रभावीरीत्या सादर करून उपस्थित शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण केली.

आजही समाजामध्ये चोरून लपून गर्भलिंग निदान चाचणी द्वारे मुलींची हत्या केली जात आहे आणि जळगाव जिल्ह्यात मुलींचे प्रमाण अत्यंत अल्प असून या प्रमाणात वाढ व्हावी तसेच मुलींना उच्च शिक्षण करून त्यांचे जीवनमान उंचवावे हा उद्देश महिला बालविकास विभागाचा असून या माध्यमातून जनजागृती कार्यक्रमांना नगरदेवळा येथून प्रारंभ करण्यात आला. सरदार एस. के. पवार विद्यालयात या कार्यक्रमाचा सकाळी नऊ वाजेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी पवार विद्यालयाचे मानद चिटणीस शिवनारायण जाधव तसेच सर्व संचालक मंडळ विद्यालयाचे प्राचार्य व्ही. बी. बोरसे तसेच सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

प्रारंभी शाहीर शिवाजीराव पाटील यांनी आपल्या भ्रूणहत्येच्या पोवाड्यातून मुलींना वाचवा व मुलींना शिकवा असा दर्जेदार संदेश दिला सोबतच शाहीर वेदराज कपाटे यांनी उत्तम गीत सादर करून प्रेक्षकांमध्ये चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाचा समारोप युवा शाहीर सुरज राऊळ यांनी महाराष्ट्र गीताने केला. यावेळी लोकरंग फाउंडेशनचे कलावंत शाहीर नामदेव पाटील, अशोक पाटील, दिगंबर पाटील, जितेंद्र भांडारकर, गोकुळ पाटील, युवा शाहीर सुरज राऊळ, सिताराम महाजन, धनराज पाटील, राजेंद्र पाटील, शाहीर राजेंद्र जोशी, शाहीर रामसिंग राजपूत, इत्यादी एकूण दहा कलावंतांसह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार राजेंद्र राजपूत, राजेंद्र जोशी व शरद महाजन यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा