पुण्यातील ‘बेटी बचाओ जनआंदोलन चळवळ’ पोचली काश्मीरमध्ये

कुपवाडा (काश्मिर), ४ जानेवारी २०२३ : पुण्यातील ‘बेटी बचाओ जनआंदोलन चळवळ’ आता काश्मीरमध्ये पोचली असून, ‘बेटी बचाओ’चा नारा देत हजारो काश्मिरी मुली आणि महिलांनी काल काश्मीरमधील कुपवाडा शहर दणाणून सोडले. कुपवाडा, येथे ‘बेटी बचाओ जनआंदोलना’च्या वतीने आयोजित केलेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने काश्मिरी मुली आणि महिला सहभागी झाल्या होत्या.

डॉ. गणेश राख यांनी ३ जानेवारी २०१२ ला पुण्यात हडपसर येथे त्यांच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये अकरा वर्षांपूर्वी ‘बेटी बचाओ जनआंदोलना’ची सुरवात केली. बघता बघता अकरा वर्षांत हे जनआंदोलन देश-विदेशांत पसरले. आजपर्यंत या आंदोलनात जगभरातून ४ लाखांपेक्षा अधिक खासगी डॉक्टर्स, १३ हजार सामाजिक संस्था आणि २५ लाखांपेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी आहेत. ते सर्वजण आपापल्या क्षेत्रात मुलींसाठी योगदान देत आहेत.

मुलगी झाल्यास प्रसूती खर्च मोफत; तसेच मुलीच्या जन्माचे केक कापून, मिठाई वाटून, सर्वत्र फुलांचा वर्षाव करून स्वागत करणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. गेल्या अकरा वर्षांत मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये २४५० मुलींच्या जन्माचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

हे जनआंदोलनल बाराव्या वर्षात पदार्पण करीत आहे, याचे औचित्य साधून कुपवाडा, काश्मीर येथे ‘बेटी बचाओ जागरूकता रॅली’चा कार्यक्रम आयोजित केला. ‘बेटी बचाओ जनआंदोलना’च्या वतीने जागरूकतेसाठी अशा प्रकारच्या एक हजारपेक्षा अधिक रॅली आणि कार्यक्रम देश-विदेशांत घेतले आहेत.

या कार्यक्रमाला कडाक्याच्या थंडीमध्येसुद्धा काश्मिरी मूली आणि महिलांची उपस्थिती; तसेच त्यांचा उत्साह लक्षणीय होता. या रॅलीचे आयोजन कुपवाडा कमिशनर ऑफिस, जिल्हा आरोग्य विभाग, शक्ती मिशन, आशा वर्कर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याहून ‘बेटी बचाओ जनआंदोलन’चे प्रणेते डॉ. गणेश राख, डॉ. दत्तात्रय डोईफोडे सर, समन्वयक डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. शिवदीप उंद्रे, डॉ. प्रमोद लोहार, अमन सय्यद आदी उपस्थित होते; तसेच रॅलीमध्ये कुपवाडा जिल्ह्याचे आयुक्त श्री. सागर डोईफोडे, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बशीर अहमद, प्रो. महनमद शोफी, डॉ. फिरदोस अहमद भट, फय्याज अहमद, रफिका लुलाबी आणि हजरोंच्या संख्येने काश्मिरी महिलांची उपस्थिती होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा