भगीरथ भालकेंचा आज बीआरएसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादी कडून तातडीने डॅमेज कंट्रोलसाठी हालचाली

पंढरपूर २७ जून २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे आज राष्ट्रवादीला रामराम ठोकत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत, बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. बीआरएस चे सर्व आमदार , खासदार आणि मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शनासाठी आहेत . यानंतर ते भालके यांच्या सरकोली गावी सर्व ताफ्यासह जाणार आहेत.

भालके याना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात असल्याने त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येने पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते बीआरएस मध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भालके समर्थक करत आहेत. के चंद्रशेखर राव आज सकाळी साडे दहा वाजता भालके यांच्या सरकोलीत पोचणार असून सुरुवातीला पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी भालके यांनी आपल्या शेतात भला मोठा मंडप उभारला आहे.

भालके यांच्या बीआरएस प्रवेशाच्या निर्णयाने राष्ट्रवादीचे धाबे दणाणले असून, काल जिल्हाध्यक्ष काकासाहेब साठे, राज्य प्रवक्ते उमेश पाटील, अभिजित पाटील, कल्याणराव काळे, गणेश पाटील अशा दिग्गजांच्या उपस्थितीत डॅमेज कंट्रोलसाठी बैठक घेण्यात आली. भालके यांना विधानसभा पोटनिवडणुकीत पडलेली मते ही राष्ट्रवादीची असून, येत्या निवडणुकीमध्ये भालके यांचे डिपॉझिट जप्त होईल असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.

दरम्यान भगीरथ भालके यांनी गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठकांचा सपाटा लावत सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते भालके यांच्या सरकोली गावात पोचले होते. अभिजित पाटील यांना शरद पवार यांनी राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर राष्ट्रवादीला फुटीची घरघर लागली असून भगीरथ भालके यांच्या जाण्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जातोय.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा