मुंबई, २० डिसेंबर २०२०: मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. सोनिया गांधी यांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे. भाई जगताप यांच्याबाबत आधीपासूनच चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तर कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले. अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली.
यासह इतर नावांची ही घोषणा करण्यात आली ज्यामध्ये, कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा यांची नियुक्ती केली आहे. प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची निवड केली. समन्वय समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमरजित सिंग मनहास यांची नियुक्ती झाली.
मुळतः भाई जगताप यांचं नाव अशोक जगताप आहे. परंतु, त्यांना भाई जगताप या नावाने ओळखले जाते. भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद निवडणूक जिंकून आमदार झाले होते.
भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
विशेष म्हणजे भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केलाय. आगामी मुंबई पालिका निवडणूक ही मराठी विरुद्ध मराठी नेते अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे