पुरंदर, २० डिसेंबर २०२०: मुंबई काँग्रेसचे नव नियुक्त अध्यक्ष भाई जगताप यांनी आज जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं आहे. त्याच बरोबर सासवड येथील काळ भैरवनाथाचं दर्शन घेऊन सपत्नीक पूजा केली आहे.
आज सकाळी भाई जगताप हे आपल्या वैयक्तिक धार्मिक कार्यक्रमासाठी पुरंदर मध्ये आले आहेत. आज त्यांनी चंपाषष्ठी निमित्त जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेतलं. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर अनुभवी नेते व विधान परिषद सदस्य भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. काल अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर आधीच्या नियोजित कार्यक्रमानिमित्त आज ते पुरंदरला आले होते. आज सकाळी त्यांनी जेजुरीत महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेरायाचं सपत्निक दर्शन घेतलं. गडावर भंडारा उधळून तळीभंडार सुद्धा केला.
तसंच सासवडचं ग्रामदैवत श्री. काळभैरवनाथ मंदिर येथे त्यांनी सपत्नीक पूजा सुद्धा केली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरंदरचे आमदार संजय जगताप सुद्धा उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जगताप यांनी राज्यातील व देश पातळीवरील नेत्यांनी दिलेल्या जबाबदारी बद्दल त्यांचे आभार मानले. तसंच दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू असा विश्वास दिला. जेजुरी येथे विविध सामाजिक संघटना, कामगार संघटना यांनी जगताप यांचं स्वागत व सन्मान केला.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे.











































