इंदापूर, दि.२१ मे २०२०: महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील महाआघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. राज्य सरकारच्या या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि.२२) सकाळी ११ वा. हे अंदलोन करणार आहे . घराच्या अंगणामध्ये येवून महाराष्ट्र बचाओच्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे गुरुवारी केले.
याप्रसंगी भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, शहराध्यक्ष शकील सय्यद उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, देशामध्ये महाराष्ट्रात कोरोना संसर्ग सर्वाधिक आहे. राज्यात सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग दररोज कमी न होता उलट वाढतच चालला आहे, त्यामुळे दररोज अनेक नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. सरकार यासंदर्भात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत असल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.तसेच लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता त्रस्त असून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार हे सर्वसामान्य जनतेसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची टाळाटाळ करीत आहे.
कोरोना व्हायरसचे संकट दूर करण्यासाठी राज्य शासनाचे अपयश समोर येत असल्याने भाजपच्या वतीने सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी प्रत्येक गावोगावी जनतेने शुक्रवारी सकाळी ११ वाजता घरासमोरील अंगणात कुटुंबीय व मित्रमंडळींसमवेत काळा मास्क, काळी फीत, काळे कपडे घालून व घोषणांचे फलक घेऊन राज्य शासनाचा निषेध करावा व शासनास जाग आणावी,असे आवाहन भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे