नाशिकमध्ये भाजपा आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील, यांचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

नाशिक २८ जून २०२३: भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हे काही दिवसात नाशिक दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या पक्ष बांधणीसाठी हा मेळावा महत्त्वाचा मनाला जातो. मात्र त्यापूर्वीच नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला असून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व असल्याचे सांगितले जाते. परंतु ग्रामीण भागात अजूनही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग असल्याचे अनेकदा दिसून येते. नाशिक शहरात काँग्रेस पदाधिकारी पक्ष वाढीत व्यस्त आहे. अशातच काँग्रेसने मोठी झेप घेत भाजपचे मोठे प्रस्थ गळाला लावला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. प्रामुख्याने यात भाजपा आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांचा समावेश होता. पाटील यांच्या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर पाटील हे काँग्रेस विचारसरणीचे असल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असे हिरे कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील सत्ताधारी शिवसेना व भाजपकडून राज्यभरात महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी चढाओढ सुरु असतानाच नाशिकमध्ये काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. नाशिक पश्चिमच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनाच पक्षात प्रवेश दिला आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यात आमदार हिरे यांची बंधू भालचंद्र पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नाशिक रोडचे पदाधिकारी गुड्डू गवई, सिडकोतील सुमित सोनवणे यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

न्यूज अन कट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा