भंडारदरा धरणातून चार आवर्तनाचे नियोजन

अकोले : भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे.
निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी किंवा सोमवारी सुटण्याची शक्यता आहे.
त्यामुळे दोन्ही धरणांत पाणीसाठा जवळपास ‘जैसे थे’ आहे. सध्या भंडारदरा धरणात १० हजार ८०३ दशलक्ष घनफूट तर निळवंडे मध्ये ७ हजार ९१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच दोन्ही धरणांमध्ये एकूण १८ हजार ७२१ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बीसाठी एका आवर्तनाचे नियोजन करण्यात आले. हे आवर्तन बुधवारी सोडण्याचे नियोजित होते. मात्र निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे गेट कार्यान्वित झाले नाही.
दोन दिवसांत हे गेट सुरळीत होईल आणि निळवंडे धरणातून रविवारी किंवा सोमवारी पाणी सोडण्यास सुरुवात होईल, असे जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश हारदे यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा