फळांनी भरलेल्या झाडांनाच लोक दगड मारतात, कारण तिथूनच काहीतरी मिळण्याची अपेक्षा असते तसेच काहीसे आता महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे भाजपचे विधानपरिषदेचे नवनियुक्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी मा.शरद पवार साहेब यांना महाराष्ट्राला लागलेला कोरना असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी कडून लढवून चांगले मताधिक्य ही घेतले व त्यानंतर विधानसभेसाठी भाजपकडून बारामतीतून निवडणूक रिंगणात उतरून तिथे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले, पण भाजपने राज्यपाल नियुक्त कोट्यातून त्यांना विधान परिषदेवर घेतले आमदार म्हणून नियुक्ती होताच त्यांनी शरद पवार साहेबांवर टिका केली.
गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील पटलावर आपले स्थान अधोरेखित केले. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जर अशी टीका करण्यात येत असेल तर ते योग्य नाही. यदाकदाचित माननीय गोपीचंद पडळकर यांनी थोडे मागे जाऊन राजकारण पाहण्याची गरज आहे माननीय अण्णा डांगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून पुढे आलेले नेतृत्व मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना १९९५ ते १९९९ या कालावधीत राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले व भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील खंदे समर्थक, पण पक्षात घुसमट होत आहे या कारणाने २००६ ला भाजपमधून बाहेर पडून स्वतःचा पक्ष काढला व नंतर तो राष्ट्रवादीत विलीन केला. शिवाजीराव शेंडगे यांनी भाजप सोबत काम केले त्यांचे चिरंजीव प्रकाश अण्णा शेंडगे यांनी भाजपकडून जत विधानसभेचे प्रतिनिधित्व केले पण २०१४ च्या विधानसभेसाठी विद्यमान आमदार असताना भाजपने तिकीट देण्यास नकार दिला व ते बाहेर पडले. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजप सोबत युती केली व विधान परिषदेवर जाऊन भाजप सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री झाले, पण त्यानंतर महादेव जानकर कुठे चर्चेत आलेले दिसत नाहीत तीच परिस्थिती सदाभाऊ खोत यांची आहे त्याचबरोबर विनायक मेटे ही दिसत नाहीत.
राजकारणात असे म्हणतात की कम्युनिस्ट ज्याच्यासोबत हस्तांदोलन करतात त्यालाच पहिले निकालात काढतात, ही नीती भाजप वापरत असेल त्यामुळेच शिवसेनेसारखा पक्ष 25 वर्षांची युती तोडून वेगळा झाला. राजू शेट्टीनीही वेगळे होऊन आत्मक्लेश करून घेतला. जॉर्ज फर्नांडिस सारखा कामगार नेता सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन पद मिळवले, पण पुढे काय झाले हा इतिहास सर्वांना माहीत आहे.
राजकारणात सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे व वेळोवेळी चूक लक्षात आणून विरोध व टीका करण्याचा अधिकार आहे, पण एखादा नेत्यावर टीका टिप्पणी करत असताना आपले राजकारणातील योगदान तपासून पहावे, कारण महाराष्ट्रातील राजकारण हे सुसंस्कृत राजकारण म्हणून भारतात पाहिले जाते, आशा महाराष्ट्रातील श्री शरद पवार साहेब यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नाही, कारण आत्ताच्या पिढीतील राजकारण्यांचे जेवढे वय आहे तितके त्यांचा संसदीय कामाचा अनुभव आहे . चुका या प्रत्येकाकडून होत असतात कारण कोणी देव नाही पण त्या योग्य भाषेत सांगाव्यात तो तुम्हाला अधिकारीही आहे. कारण तुम्ही आता रस्त्यावरचे कार्यकर्ते नसून एका राष्ट्रीय पक्षाचे विद्यमान आमदार आहात व आमदाराच्या तोंडी ही भाषा योग्य नाही.
मा.गोपीचंद पडळकर यांनी वरील सांगितलेल्या नेत्यांच्याकडून काय तो अर्थबोध घ्यावा, कारण आत्ताच कुठे आपली राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आहे ती पुढेही बहरत जावी हीच सदिच्छा.
अशोक कांबळे