पुणे ३ सप्टेंबर २०२४ : शतकाहून अधिक काळ संशोधन परंपरेचा वारसा असणाऱ्या पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ संस्थेच्या वतीने नव्या शैक्षणिक धोरणाला सुसंगत असा ‘परिचय भारतीय ज्ञान-परंपरेचा’ हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला असल्याची घोषणा संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. भारतीय ज्ञान प्रणालीचा (आयकेएस) अभ्यासक्रम संपूर्णतः मराठी भाषेमधून उपलब्ध झालेला हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यासक्रम आहे. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप आपटे, या प्रकल्पाच्या समन्वयक व आशय परीक्षक डॉ. गौरी मोघे व संस्थेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचे समन्वयक मिथिलेश कुलकर्णी आणि चिन्मय भंडारी आदी उपस्थित होते.
याविषयी बोलताना भूपाल पटवर्धन म्हणाले, “संस्थेने कोरोना काळात राबविलेल्या काही ऑनलाइन उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातून प्रेरणा घेऊन भांडारकर संस्थेने गेल्या १०० वर्षात केलेल्या संशोधनातून संकलित केलेले ज्ञान त्याविषयी जिज्ञासा व आवड असलेल्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून ‘भारतविद्या’ या ऑनलाइन / डिजिटल उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत सध्या १४ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एनईपी २०२० नुसार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय ज्ञान-परंपरेवर आधारित २ श्रेयांकांचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून देखील काढण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आम्ही सदर अभ्यासक्रम इंग्रजी भाषेतून विकसित करून गेल्यावर्षी उपलब्ध करून दिला, जो आजवर १० हजार हून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. आता हाच अभ्यासक्रम अत्यंत सोप्या व रंजक पद्धतीने आणि तो ही नव्या पिढीला आवडणाऱ्या डिजिटल / ऑनलाईन माध्यमातून मराठी भाषेत उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे.”
प्रदीप रावत म्हणाले, “मातृभाषेतील शिक्षण हा देखील नवीन शैक्षणिक धोरणामधील एक महत्वाचा भाग आहे. त्याला अनुसरून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. प्राचीन भारतीय ज्ञानाच्या प्रसारामध्ये मातृभाषेचे असलेले महत्त्व अधोरेखित करत आणि भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये अपेक्षित असलेले विषय मातृभाषेत रुजवण्यासाठी आम्ही याद्वारे योगदान देत आहोत. तसेच देशाच्या भावी पिढीला प्रेरित करत भारतीय ज्ञानाचा समृद्ध वारसा आधुनिक जगात टिकवून ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न देखील करत आहोत.”
‘परिचय भारतीय ज्ञान-परंपरेचा’ या मराठी अभ्यासक्रमाद्वारे वर्तमानातील आधुनिक पद्धतींचा वापर करीत डोळस पद्धतीने प्राचीन भारतीय ज्ञान-परंपरा आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. भांडारकर संस्थेच्या संशोधन परंपरेनुसार तथ्यांवर आधारित माहिती विद्यार्थ्यांसमोर आणली जाईल. हा अभ्यासक्रम या विषयात रस असणाऱ्या सर्वांना उपलब्ध असेल. व्यक्तिशः सहभागासाठी ₹१९९९/- इतक्या माफक दरात उपलब्ध असेल. तसेच, महाविद्यालयांनी भांडारकर संस्थेशी सहकार्य करार केल्यास सवलतीच्या दरात हा अभ्यासक्रम घेता येईल.” अशी माहिती डॉ. प्रदीप आपटे यांनी दिली.
डॉ. गौरी मोघे म्हणाल्या, “प्राचीन भारतीय ज्ञान-परंपरेतील अनेक महत्त्वाचे विषय या अभ्यासक्रमांतर्गत आम्ही समाविष्ट केले असून ऑडीओ-व्हिडीओ माध्यमातून ते आम्ही विद्यार्थ्यांसमोर सादर करत आहोत. एकूण ३० तासांच्या या अभ्यासक्रमात २७ सेशन्स आहेत. याद्वारे नव्या शैक्षणिक धोरणानुसार २ श्रेयांक विद्यार्थ्यांना संपादित करता येतील. तर्कशुद्धतेचा आधार असलेल्या प्री-रेकॉर्डेड सेशन्सचा सुयोग्य क्रम, विषयानुरूप रचना, ग्राफिक्सचा योग्य वापर आणि चांगले सादरीकरण यावर भर देत हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.”
या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान-परंपरा, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण, भारतीय तत्वज्ञान, गणितातील प्राचीन भारतीय पद्धत व परंपरा, आयुर्वेद, योगशास्त्र, कला, स्थापत्य, मंदिर स्थापत्य, मूर्तीशास्त्र, प्राचीन भारतीय अन्न परंपरा, शेती, पशुपालन व भारतातील प्रमुख राजवंश आदी विषय शिकवले जातील. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या त्या विषयाचे गाढे अभ्यासक व तज्ज्ञ हे ते ते विषय शिकवताना आपल्याला दिसतील. थोडक्यात काय तर bharatvidya.in वरील या ‘परिचय भारतीय ज्ञान-परंपरेचा’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आवश्यक असे शैक्षणिक क्रेडिट्स मिळवताना विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध परंपरेबद्दल माहितीसुद्धा मिळेल. या अभ्यासक्रमाची परीक्षा / मूल्यमापन प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच अभ्यासक्रमाच्या शेवटी असलेल्या MCQ पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरे देऊन होईल. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देखील मिळेल, असे डॉ. मोघे यांनी नमूद केले.
हा अभ्यासक्रम आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये संस्थात्मक पातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी काही नामांकित संस्थांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेशी सहकार्य करार केला आहे. यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, श्री बालाजी विद्यापीठ – पुणे, वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ आदी संस्थाचा समावेश आहे. याप्रमाणेच, पुण्यातील व इतर राज्यातील काही संस्था देखील अशाचप्रकारे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आमच्याशी चर्चा करत आहेत, अशी माहिती मिथिलेश कुलकर्णी यांनी दिली.
‘परिचय भारतीय ज्ञान-परंपरेचा’ या अभ्यासक्रमावर मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये डॉ. प्रदीप आपटे, डॉ. गौरी मोघे, डॉ. मुग्धा गाडगीळ, डॉ. विजया देशपांडे, प्रणव गोखले, डॉ. मनीष वाळवेकर, राजस वैशंपायन, डॉ. योगेश बेंडाळे, डॉ. गिरीश वेलणकर, डॉ. भाग्यश्री यारगोप आदींचा समावेश आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील