भारत आणि चीन यांच्या विवादांमध्ये रशियाची काय भूमिका असेल

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध गेल्या काही दशकांपासून अतिशय चांगले राहिले आहेत. परंतू अलीकडच्या काळात भारत, चीन आणि रशिया या तीन देशांचा विचार करता तसेच अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढते संबंध पाहता रशियाचा कल चीनच्या बाजूने जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यामध्ये सुरू असलेल्या वादावरून कुटनितिक चर्चा चालू आहे. यादरम्यान रशिया यामध्ये कोणाची बाजू घेतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

त्यामुळेच भारत आणि चीन यांच्यामध्ये सुरू असलेल्या कुटनितिक चर्चेमध्ये रशिया एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. मंगळवारी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशिया-भारत आणि चीनच्या (आरआयसी) परराष्ट्र मंत्र्यांची आभासी बैठक आयोजित केली. वृत्तानुसार, सुरुवातीला भारताला या त्रिपक्षीय बैठकीत भाग घ्यायचा नव्हता परंतू आयोजक रशियाच्या विनंतीनंतर भारताने सहमती दर्शविली. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह ही रशियाच्या विजय दिन परेडमध्ये भाग घेण्यासाठी दाखल झाले आहेत. कोरोना साथीच्या काळात भारताचा एखादा मंत्री परदेशात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

चीन आणि रशिया यांच्यातील वाढते हितसंबंध भारतासाठी एक चिंतेची बाब बनली आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-७ गटामध्ये भाग घेण्यासाठी रशियाला आमंत्रण केले होते. मात्र चीनला या गटामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आमंत्रण गेले नव्हते. यावर रशियाने असे वक्तव्य केले होते की, जी-७ ची स्थापना केवळ चीनला मुख्य प्रवाहातून बाजूला करण्यासाठीची एक रणनीती आहे. रशियाने असे देखील सांगितले होते की, रशिया अशा कोणत्याही गटामध्ये सहभागी होणार नाही किंवा अशा कोणत्याही रणनीती मध्ये सहभागी होणार नाही जी रणनीती चीनला बाजूला करण्यासाठी आखली गेली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारताला देखील या जी-७ गटामध्ये आमंत्रित केले होते व भारताकडून याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया देखील देण्यात आली होती.

मंगळवारी झालेल्या आभासी बैठकीत परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, भारत आणि चीनला आपापसातील मतभेद मिटवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाची आवश्यकता नाही. ते म्हणाले की, “मला नाही वाटत की भारत आणि चीनला इतर कोणाची आवश्यकता लागेल आपल्या वाद मिटवण्यासाठी . दोन्ही देश आपापसातील वाद मिटविण्यासाठी सक्षम आहेत. विशेष करून अशा परिस्थितीत जेव्हा हा वाद देशांतर्गत असेल. खास करून मी हे सध्याच्या परिस्थितीसाठी बोलत आहे.”

आरआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, नवी दिल्ली आणि बीजिंग यांनी शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. त्यांनी संरक्षण अधिकारी, परराष्ट्रमंत्री या पातळीवर बैठकांना सुरुवात केली आणि या बैठकीत दोन्ही देशांतील कोणीही असे विधान केले नाही की ज्यामुळे गैर कूटनीतीक परिस्थिती निर्माण होईल. तथापि, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे नाव न घेता बरेच काही बोलले. ते म्हणाले की, सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन केले पाहिजे आणि एक स्थायी वैश्विक व्यवस्था स्थापन करण्यासाठी मदत केली पाहिजे. ते म्हणाले की जगातील सर्व अग्रस्तरीय देशांनी एक आदर्श घडवत सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या रशिया दौर्‍याच्या मुख्य अजेंड्यात शस्त्रांविषयी आढाव्यांचा देखील समावेश आहे. संरक्षणमंत्री म्हणाले की त्यांना आशा आहे की शक्य तितक्या लवकर आम्हाला रशियाकडून शस्त्रे मिळतील आणि भारताने ज्या मागण्या ठेवल्या आहेत त्यांची पूर्तता केली जाईल. त्याच वेळी, रशियाचे उपपंतप्रधान वाय. बोरिसोव्ह यांनी आश्वासन दिले की जर भारताची अखंडता आणि ऐक्य यावर कधी प्रश्न पडत असेल तर आम्ही सर्वतोपरी भारताबरोबर उभे राहण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आता या सर्व घटनांमध्ये असा प्रश्न निर्माण होतो की भारत आणि चीन यांच्या दरम्यान जर संबंध अधिकच खराब झाले तर रशिया कोणाची बाजू घेईल? कॉम्प्रिहेन्सिव्ह युरोपियन अँड इंटरनॅशनल स्टडीज सेंटरच्या वरिष्ठ संशोधन फेलो वसिली बी. काशीन म्हणाले की, भारत आणि चीन यांच्यात जे घडत आहे ते
दु:खदायक आहे, परंतू रशिया या सर्व प्रकारांमध्ये कोणत्याही एका देशाची बाजू घेणार नाही किंवा कोणत्याही एका देशाच्या विरोधाचे समर्थन करणार नाही. वसिली बी काशीन म्हणाले की रशिया आपले संबंध जशास तसे ठेवेल. राहिला प्रश्न देशांतर्गत होणाऱ्या व्यापाराचा तर रशिया युरोपियन संघासह ४० टक्के आणि चीनबरोबर १५ टक्के व्यापार करतो, म्हणून कुठूनही रशियाचा व्यापार चीनवर अवलंबून नाही. तथापि, चीनकडून रशियाला मोठ्या प्रमाणावर युद्धसामग्री साठी मागण्या होऊ शकतात. अर्थात रशिया एक मोठा युद्धसामग्री निर्माता आहे. महत्त्वाचे म्हणजे चीनची सैन्या ताकद देखील दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे त्यांना युद्ध समुद्रची देखील मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. परंतू याचा अर्थ असा नाही की चीनच्या सांगण्यावरून रशिया आपले संबंध कमी करेल किंवा वाढवेल तसेच कोणता निर्णय घेईल.

ते म्हणाले की, भारताचे संरक्षण धोरण एका स्रोतावर अवलंबून नाही. भारत युरोपियन युनियन मधून देखील युद्धसामग्री विकत घेतो तसेच अमेरिकेकडून देखील विकत घेतो. परंतू अमेरिका शस्त्रांच्या मागणीला एक राजनीतिक दृष्टिकोण देतो ज्यामुळे कुटनीतिक स्तरावर किंवा जागतिक राजकारणाच्या स्तरावर काही फायदे किंवा काही तोटे देखील होतात.

ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ओआरएफ) चे सहकारी नंदन उन्नीकृष्णन यांचे म्हणणे आहे की भारत-चीन वादात रशिया हस्तक्षेप करणार नाही. ते म्हणाले, रशियाचा देशांतर्गत व्यवसाय केवळ चीन सोबतच नाही तर तो भारतासोबत ही आहे. केवळ चीनच्या सांगण्यावरून रशिया आपले नुकसान करून घेणार नाही किंवा चीनच्या हातातील बाहुले होणे रशियाला कधीही पसंत नसणार.

परंतू हे आपल्याला मान्य करावे लागेल की रशिया आणि भारत यांच्यातील संबंध हळूहळू कमी होत चालले आहेत. अर्थात हे संबंध खराब होण्यासाठी आणखीन बराच काळ लागेल परंतू याला कुठे ना कुठे सुरुवात झाली असल्याचे दिसत आहे. याचे कारण असे की भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध चांगले होत आहेत. तसेच भारताने अमेरिकेकडून शस्त्र खरेदी करण्यास देखील सुरुवात केली आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून वादाचे संबंध आहेत. एकेकाळी भारत शस्त्र खरेदी साठी केवळ रशियावर अवलंबून होता परंतू तो आता अमेरिकेकडे वळत आहे हे रशियाला न आवडणारे आहे.

ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा