चीनवर सामरिक प्रहार: भारत भूतानमध्ये रेल्वे प्रकल्प

भारत आणि चीनमधील सीमा तणावादरम्यान, भारताने भूतानसाठी दोन रेल्वे लाईन्सची घोषणा केली आहे. या रेल्वे प्रकल्पांमुळे भारत आणि भूतानमधील व्यापार वाढेल. त्यामुळे भूतानमधील वस्तू रेल्वेने बंदरांपर्यंत पोहोचवणे देखील सोपे होईल. पण हे फक्त एवढ्यापुरते मर्यादित नाही; त्यामागे भारताची रणनीती आहे. चीनला वेळीच प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या या पावलामुळे भारतीय सैन्याच्या धोरणात्मक क्षमता तर वाढतीलच, पण सीमेवर चीनच्या बाजूने एकतर्फी झुकलेल्या धोरणात्मक संतुलनातही बदल होईल.

देशाच्या संरक्षण व्यवस्थेतही बुद्धिबळाचा आधार घेतला जातो. शत्रूपक्ष कुठले प्यादे कधी हलवेल आणि त्याला कसे मारायचे, याची व्यूहनीती आखली जाते. याला ‘स्ट्रॅटिजिक’ व्यूहनीती म्हटले जाते. भूतानमध्ये भारत रेल्वे लाईन टाकणार आहे. ही रेल्वे लाईन फक्त कोणतीही सामान्य रेल्वे लाईन नाही; सध्या भूतानमध्ये कोणतीही रेल्वे लाईन नाही. आता भारत भूतानला दोन्ही बाजूंनी रेल्वेने जोडणार आहे. त्यावर अंदाजे चार हजार कोटी रुपये खर्च केले जातील. इतक्या वर्षांनंतर हे का घडत आहे आणि त्याचा अर्थ आणि उद्देश काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

या रेल्वे लाईन्स कुठे बांधल्या जातील ते पाहिले पाहिजे. भूतान आणि भारताची सीमा सुमारे ७०० किलोमीटर आहे. एका बाजूला, भूतानची भारताशी असलेली सीमा पश्चिमेला सिक्कीममध्ये सुरू होते; पण सिक्कीमची सीमा फक्त ३२ किलोमीटर आहे. त्यानंतर भूतानच्या खाली, म्हणजेच दक्षिणेला, पश्चिम बंगालचा दार्जिलिंग-सिलीगुडी परिसर आहे. पश्चिम बंगाल आणि भूतानची सीमा १८३ किलोमीटर आहे. त्यानंतर भूतानच्या अगदी खाली, म्हणजेच दक्षिणेस, आसाम आहे. आसाम आणि भूतानची सीमा २६७ किलोमीटर आहे. त्यानंतर भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेशचा तवांग परिसर आहे. भूतानची अरुणाचल प्रदेशाशी असलेली सीमा २१७ किलोमीटर आहे.

याचा अर्थ असा की भूतान तीन बाजूंनी भारताने वेढलेले आहे: पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल आणि आसाम, आणि पूर्वेस अरुणाचल प्रदेश. उत्तरेस तिबेट आहे, म्हणजेच चीन. भूतानच्या पश्चिमेस संपूर्ण सीमा सिक्कीमशी नाही; ती फक्त ३२ किलोमीटर आहे. सिक्कीम आणि भूतानमधील भागात तिबेट किंवा चीनची एक खोरी आहे, ज्याला चुम्बी खोरे म्हणतात. चुम्बी खोरे भूतान आणि सिक्कीममध्ये खंजिरासारखे आहे. या खंजिराच्या अगदी दक्षिण टोकावर डोकलाम आहे. पहिली, आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गेलेफूपर्यंत रेल्वे लाईन बांधली जाणार आहे. ही सुमारे ७० किलोमीटरची लाईन असेल. सहा नवीन स्टेशन बांधले जातील आणि त्यासाठी अंदाजे साडेतीन हजार कोटी रुपये खर्च येईल. कारण त्यासाठी अनेक पूल बांधावे लागतील. पर्वतांमध्ये रेल्वे मार्ग बांधणे हे मैदानी भागात रेल्वे मार्ग बांधण्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. अभियांत्रिकी अविश्वसनीयपणे गुंतागुंतीची आहे; असंख्य पूल बांधले जात आहेत आणि त्याची किंमत मैदानी भागातील रेल्वे लाईनशी तुलना करता येत नाही.

भूतानला जाणारी रेल्वे लाईन ही फक्त एक प्रकल्प नाही, तर हिमालयातील धोरणात्मक संतुलनाचा पुरावा आहे. दुसरी मार्गिका पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील समत्से पर्यंत धावेल. फक्त २० किलोमीटर आहे; पण हे २० आणि ७० किलोमीटरचे रेल्वे मार्ग भूतानला भारताच्या ७० हजार किलोमीटरच्या रेल्वे नेटवर्कशी जोडतील. आसाममधील कोक्राझार आणि पश्चिम बंगालमधील बनारहाट हे आधीच रेल्वे नेटवर्कचा भाग आहेत.

भारत भूतानमध्ये उत्पादित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीपैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त वस्तू खरेदी करतो. सध्या सर्व माल ट्रकने येतो. ट्रकना डोंगराळ रस्त्यांवरून जाण्यात अडचणी येतात आणि वाहने अनेकदा अडकतात. चीनने या वर्षी चुंबी खोऱ्यापर्यंत रेल्वे मार्ग टाकण्यास सुरुवात केली आहे. चीन संपूर्ण तिबेटमध्ये रेल्वे लाईन बांधत आहे; परंतु या भागात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की चुम्बी खोऱ्यातील यातुंगपर्यंत विस्तारण्याची त्याची योजना आहे.

या पलीकडे, भूतानमध्ये असलेल्या डोकलामचे क्षेत्र आहे. २०१७ मध्ये चीनने डोकलामवर आपला दावा सिद्ध करण्यासाठी सैन्य पाठवले. भारताचा भूतानशी संरक्षणात्मक करार आहे, त्यामुळे भूतानचा बचाव हा भारतीय सैन्याच्या जबाबदारीचा भाग असेल. चीनने कदाचित हे अपेक्षित केले नसेल; परंतु जेव्हा चीनने डोकलाममध्ये आपले सैन्य पाठवले, तेव्हा भारतीय सैन्य लढण्यासाठी तिथे गेले. सिलिगुडी कॉरिडॉर, ज्याला ‘चिकन्स नेक’ असेही म्हणतात, हा अरुंद जमिनीवरील मार्ग आहे. हा मार्ग फक्त २२ किलोमीटर रुंद असून, त्याच्या खाली बांगलादेश आहे. या मार्गाजवळ चीनी सैन्याची उपस्थिती भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहते.

भारत भूतानमध्ये रेल्वे लाईन टाकत आहे. भारत भूतानला चार हजार कोटी रुपयांचे कर्ज देत नाही; हा सर्व खर्च भारत सरकार करणार आहे. भूतानला तो परतफेड करण्याची गरज नाही. चीन भूतानच्या सीमेलगत रेल्वे लाईन टाकत असेल, तर गरज पडल्यास त्याचे सैन्य थोड्याच वेळात तिथे पोहोचू शकते. भारतही निष्क्रिय बसलेला नाही; दोन्ही मार्ग दक्षिण भूतानला भारताच्या रेल्वे नेटवर्कशी जोडतील.

हे प्रकल्प केवळ लष्करी दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाहीत, तर भारत आणि भूतानमधील आर्थिक आणि राजनैतिक संबंध दृढ करतात. यामुळे दोन्ही देशांमधील परस्पर विश्वास वाढेल आणि चीनच्या विस्तारवादी रणनीतीला आळा बसेल. भूतानला बांधण्यात येणारे रेल्वे मार्ग हे भारताच्या धोरणात्मक स्थितीचा एक महत्त्वाचा भाग आहेत. या मार्गांमुळे सैन्य, शस्त्रे आणि रसद लवकर हालचाल करू शकतील, ज्यामुळे युद्ध परिस्थितीत बचत आणि रणनीतिक फायदाही मिळेल.

भागा वरखेडे