भारत जोडो यात्रा एक संधी- नंदा म्हात्रे

रायगड, ६ नोव्हेंबर २०२२: राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली असून आज ६० वा दिवस आहे.आतापर्यंत एक तृतीयांश भाग पूर्ण झाला आहे. ४ राज्य १८ जिल्ह्यातून ही यात्रा गेली आहे. आज तेलंगणातील जिल्हे पूर्ण करून उद्या पासून महाराष्ट्रात १६ दिवस यात्रा चालणार आहे. दररोज २२ किमी अंतर पूर्ण केले जात आहे.

भारत जोडो यात्रे साठी देशभरातील १२० कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. या मध्ये रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नंदा म्हात्रे यांचाही समावेश आहे. देशभरातील ५० हजार कार्यकर्त्यांमधून त्यांची या पदयात्रेसाठी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या त्या राज्य समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. पेण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली होती.

तसेच नंदा म्हात्रे यांनी भारत जोडो यात्रे संदर्भात माध्यमांशी बोलताना यात्रा बद्दल अनुभव सांगितला आहे. परिवाराला सोडून पाच महिने घरापासून लांब राहण्याचा निर्णय अवघड. पण दोन्ही मुलींनी आणि पतीने मला ही संधी सोडू नको असे सांगितले. घरातील सर्व जबाबदारी त्यांनी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे यात्रेत सहभागी होता आले. सुरवातीचे काही दिवस कठीण गेले. पायाला फोडे येणे, चालताना त्रास होणे असे प्रकार होत गेले आणि नंतर सवय होउन गेली.

भारत जोडो यात्रेकरांचा दिवस रोज सकाळी सव्वा पाच वाजता सुरू होतो. नाश्ता आणि ध्वजवंदन करून आम्ही चालायला सुरुवात करतो. संध्याकाळी कॅम्प जिथे असेल तिथे थांबतो तसेच ७० कन्टेनरमध्ये आमच्या १२० जणांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर जेवणाची व्यवस्था तंबूत करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. राहुल गांधी हे सुद्धा याच कंन्टेनर मध्ये आराम करतात.

तसे तर आज भारत जोडो यात्रा काँग्रेसपुरती मर्यादित राहिलेली नाही यात्रा मध्ये सामाजिक संस्थाही या यात्रेशी आता जोडल्या गेल्या आहेत. तसेच कन्हैया कुमार, योगेंद्र यादव यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रा खऱ्या अर्थाने लोक, समाज आणि विविध घटकांना जोडणारी झाली आहे. या यात्रेचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे, असेही नंदा म्हात्रे म्हणाल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा