G20 मध्ये पंतप्रधान मोदींसमोर ‘भारत’ लिहिलेला नामफलक

नवी दिल्ली, ९ सप्टेंबर २०२३ : आजपासून नवी दिल्लीत G20 शिखर परिषद सुरू झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी भारत मंडपम येथे उद्घाटनाचे भाषण केले, तेव्हा दिसलेल्या एका दृष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि ते म्हणजे पंतप्रधान मोदींच्या समोर देशाचे नाव इंडिया नव्हे तर भारत असे लिहिले होते. जगभरातील अनेक नेते या परिषदेसाठी भारतात आल्याने त्यांच्या योग्य पाहुणचारासाठी भारताने खबरदारी घेतली आहे. दरम्यान, शिखर परिषदेला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कारण, या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरील नामफलकावर भारत असा उल्लेख आहे.

आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधानांच्या आसनासमोर देशाचे नाव INDIA न लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेवटची G20 बैठक १४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान बाली, इंडोनेशिया येथे झाली होती. तेव्हा पीएम मोदींच्या पुढे देशाचे नाव इंडिया लिहिले गेले होते. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात अधिकृतपणे इंडियाऐवजी देशाचे नाव भारत लिहिणे हा एक मोठा संदेश आहे. त्यामुळे देशाचे नाव बदलून इंडियाऐवजी भारत असे करण्याच्या अंदाजांना आणखी बळ मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून इंडिया नाव वगळून त्यात भारत असं नाव जाणीवपूर्वक लिहिले जात आहे. जी २० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडंट ऑफ भारत असा उल्लेख झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर, अनेक महत्त्वाची कागदपत्र, सरकारी पुस्तिकेतही इंडियाचं भारत असं नामकरण करण्यात आलं आहे. G-20 परिषदेची आज बैठक होत आहे.

या बैठकीसाठी जगभरातील विविध देशांचे प्रमुख आज राजधानी दिल्लीत आले असुन या G-20 परिषदेला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G-20 च्या बैठकीत प्रस्तावना केली. G-20 शिखर बैठकीमध्ये PM मोदींच्या समोर लावलेल्या फलकावर INDIA ऐवजी इंग्रजीत BHARAT लिहिलेले दिसले. अशा स्थितीत देशाचे नाव बदलण्याच्या अफवा खऱ्या आहेत का? या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र, याबाबत पंतप्रधान मोदींकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा