नवी दिल्ली, दि. १३ जून २०२० : जगभरात कोविड -१९ च्या साथीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. परंतू भारतामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एक सकारात्मक गोष्ट पाहण्यास मिळत आहे. परकीय चलन साठ्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच ५०० अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे.
आकडेवारी काय म्हणते?
आकडेवारीनुसार ५ जून रोजी संपलेल्या आठवड्यात $ ८.२२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे आणि यामुळे परकीय चलन साठा ५०१.७ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. परकीय चलन साठ्याची ही रक्कम एका वर्षाच्या आयात खर्चाइतकीच आहे. मागील २९ मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा ३.४४ अब्ज डॉलरने वाढून $ ४६३.४८ अब्ज डॉलर्सवर पोहोचला. जर आपण भारताच्या परकीय चलन साठ्याची इतर देशांशी तुलना केली तर आपण तो चीन आणि जपाननंतर तिसर्या स्थानावर पोहोचला असल्याचे पाहू शकतो.
वाढीचे कारण काय?
परकीय चलन साठा वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे कच्चे तेल. मार्च महिन्यामध्ये देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सर्व उद्योगधंदे ठप्प आहेत. तसेच देशातील वाहतूक सेवा देखील बंद आहे. त्यामुळे इंधनाची खपत मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. जवळपास ती खपत होत नसल्याच्या टप्प्यावर आली होती. कच्चा तेलाशी निगडित आणखी एक गोष्ट म्हणजे कोविड -१९ मुळे सर्वच जगामध्ये उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाची मागणी जगभरातून कमी झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या किंमती देखील कमी झाल्या. देशातील एकूणच कच्च्या तेलाच्या कमी मागणी आणि त्यात काच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती यामुळे भारताकडचे परकीय चलन बाहेर जाणे थांबले. आपण कच्चे तेल हे डॉलरच्या बदल्यात विकत घेतो.
दुसरी गोष्ट म्हणजे सर्वच बंद असल्यामुळे भारतातील आयात देखील कमी झाली होती त्याचाही परिणाम या परकीय चलन साठ्याच्या वाढीवर दिसून येतो. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून भारतीय शेअर मार्केट सातत्याने खाली पडत आहे. परंतु, काही दिवसांपासून आता ते पुन्हा पूर्ववत येण्यास सुरुवात झाली आहे. शेअर बाजारामधील सर्वच कंपन्यांचे भाव खालच्या स्तरावर येऊन पोहोचले आहेत.
गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जाते. याला अनुसरून परदेशातील गुंतवणूकदारांनी भारतामध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. त्याच्या माध्यमातून भारतामध्ये परकीय चलन आले. या सर्वांचा परिणाम म्हणजे भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी वाढ दिसून आली आहे.
आनंद महिंद्रा यांना आठवले ९० चे दशक
परकीय चलन साठ्यामध्ये होत असणारी वाढ याबाबत आनंद महिंद्रा यांनी आनंद व्यक्त केला. याबाबत सांगताना ते म्हणाले की मला तीस वर्षांपूर्वीची स्थिती अचानक आठवली. यासंदर्भातील एक बातमी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर करत त्यांनी सांगितले की ‘३० वर्षांपूर्वी भारताचा परकीय चलन साठा जवळपास शून्यावर आला होता. (नव्वदच्या दशकामध्ये भारतावर मोठे आर्थिक संकट आले होते. भारताच्या अर्थव्यवस्थेतील तो काळ सर्वात बिकट काळ मानला जातो.) पण आता आपल्याकडे जगातील तिसरा सर्वात मोठा परकीय चलन साठा आहे. या वातावरणात ही बातमी मनोबल वाढवणारी आहे. आपल्या देशाची क्षमता विसरु नका आणि आर्थिक विकासाच्या मार्गावर येण्यासाठी त्याचा योग्यरित्या वापरा. ’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे