आंबेगाव, दि. ९ जुलै २०२०: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर या आगोदरच प्रशासनाने गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी श्रावण महिन्यातही बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर यात्राही रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना धार्मिक महत्व असलेला श्रावण महिना काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या महिन्यात बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे देशभरातून भाविक येत असतात. त्यामुळे भीमाशंकर परिसरात कोरोनाचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. याचीच दखल घेत मंचर येथे देवस्थान ट्रस्टची, पोलीस व प्रशासनाची एकत्रीत बैठक पार पडली. या बैठकीत श्रावण यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे श्रावण महिन्यात भाविकांनी भीमाशंकर परिसरात येऊ नये, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे यांनी केले.
भीमाशंकर परिसरात पाऊस सुरू असुन डोंगदऱ्यांतून धबधबेही सुरू झाले आहेत. संपुर्ण परिसरात शुभ्र धुक्यांची चादर पसरली आहे, असा हा नयनरम्य निसर्ग पाहण्याचा मोह अनेक पर्यटकांना असतो. मात्र यंदा कोरोनाच्या महामारीमुळे भीमाशंकर मंदिर परिसरात पर्यटनावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करुन भीमाशंकर परिसरात प्रवेश करु नये, अन्यथा कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनीधी – साईदिप ढोबळे