संपुर्ण श्रावण मासातील भिमाशंकर यात्रा भाविकांविना संपन्न.

भिमाशंकर, १७ ऑगस्ट २०२०: हर हर महादेव……. भिमाशंकर महाराज की जय…… बम बम भोलेच्या….. जयघोषात भिमाशंकर येथे श्रावण मासातील चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी महाआरती करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे भिमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच श्रावण मासात भिमाशंकर यात्रा भाविक भक्तांविना पार पडली.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे शेवटच्या म्हणजे चौथ्या सोमवारी शिवलिंगाची महाआरती करून आज श्रावणातील यात्रेची सांगता झाली. विविध फुलांनी सजावट करुन या वेळी महाअभिषेक करण्यात आला.

दरवर्षी श्रावण महिन्यात लाखोंच्या संख्येने भाविक भिमाशंकरला हजेरी लावतात. मात्र, यंदा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांविना आज मंदिरात पूजा पार पडली. परंपरेनुसार पुजा पाच पूजाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पहाटेच्या सुमारास शिवलिंगाला विविध फुलांनी सजविण्यात आले होते.

त्यानंतर, शिवलिंगावर महाअभिषेक करण्यात आला. मंदिर श्रावण महिन्यात बंद असल्यामुळे परिसरातील सर्व दुकाने, हार बेल फूल, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे या भागातील छोटे व्यवसायीक व नागरिकांना श्रावण महिन्यात मिळणारा रोजगार यावर्षी मिळाला नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले असून शासनाने काहीतरी मदत करावी, अशी अपेक्षा येथील दुकानदारांनी न्यूज अनकटशी बोलताना केली.

न्यूज अनकट प्रतिनीधी साईदिप ढोबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा