भीमाशंकरचे दर्शन आता खड्ड्यांची वाट तुडवत, देवस्थानासह प्रशासनाकडून देखील खड्ड्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष

भीमाशंकर, २८ जुलै २०२३ : श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्रावण व महाशिवरात्रीला दर्शनाला येत असतात. येथे अभयारण्य असल्याने निसर्गप्रेमींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. यातच तळेघर ते कोंढवळ फाटा येथील रस्ता खड्ड्यात गेला असून, वेडीवाकडी धोकादायक वळणे मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे भाविकांसह स्थानिकांचे छोटे मोठे अपघात घडत आहेत.

एकंदरीत खड्ड्यांची वाट तुडवत भीमाशंकरचे दर्शन होत असल्याचे वास्तव, यानिमित्ताने उघड झाले आहे. तळेघर ते कोंढवळ फाटा दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्याकडेला वेली, झाडे-झुडपी वाढली आहेत. यामुळे वळण रस्ता समजून येत नाही. बेजबाबदार वाहनचालकांमुळे अपघात होण्याच्या संख्येत वाढ होत आहे.

या रस्त्यावर मुलभूत सुविधा पुरविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी भक्त, पर्यटक आणि येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या भागात चालक मदयधुंदीत वाहन चालवताना दिसतात. यामुळे अपघातांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. याचा नाहक त्रास येणाऱ्या भाविकांना होत असुन श्रावणात होणारी गर्दी पाहता, खड्डयांबाबत प्रशासनाने त्वरित पाऊल उचलण्याची मागणी भाविक व स्थानिक ग्रामस्थांनी केलीय.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा