Massive Crowd Celebrating Ambedkar Jayanti: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी नगरी आज उत्साहाच्या सागरात न्हाऊन निघाली. शहरातील भीमसृष्टी परिसरात अनुयायांचा जनसागर लोटला होता. आकाशात फडफडणाऱ्या निळ्या पताका, डोळे दिपवणारी रोषणाई आणि ढोल-ताशांच्या गजराने वातावरण भारून गेले होते. सायंकाळच्या सुमारास तरुणाईने डीजेच्या तालावर थिरकत जल्लोष केला, तर ‘लय मजबूत भीमाचा किल्ला’ यांसारख्या गीतांनी परिसर दुमदुमला.


जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि भीमसृष्टी येथे भीमसैनिकांचा प्रचंड उत्साह दिसून आला. भीमसृष्टीला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते, तर त्यावर केलेली नेत्रदीपक रोषणाई लक्ष वेधून घेत होती. याठिकाणी प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल होती. बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तक प्रदर्शनाला आणि निळ्या टोप्या, फेटे खरेदीसाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. अनेक तरुणाईने निळ्या रंगाचे फेटे आणि टोप्या परिधान करून आपला आनंद व्यक्त केला.
भीमसृष्टीत महामानवाला अभिवादन करण्यासाठी अक्षरशः अलोट जनसागर उसळला होता. अनुयायांसाठी ठिकठिकाणी अल्पोपाहार आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती, तसेच स्वागत फलकही लावण्यात आले होते. सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्था चोख ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने आरोग्य पथक आणि अग्निशामक दलाचे जवान तैनात होते. वाहतूक नियोजनामुळे पिंपरी चौकात कोणतीही कोंडी झाली नाही.
सायंकाळच्या मिरवणुकांनी पिंपरी शहरात आणखी रंगत भरली. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या समर्थकांनी चौकात डीजे लावला होता, ज्यावर भीमगीते गुंजत होती. एलईडीच्या मोठ्या स्क्रीनवर गाण्यांच्या तालावर अनुयायांनी ठेका धरला. शहरातील विविध भागातून, जसे की पिंपरी गावठाण, चिंचवड, नेहरूनगर, मोरवाडी आणि चिंचवड स्टेशन, येथून रात्री उशिरापर्यंत मिरवणुका येत होत्या आणि ढोल-ताशांच्या गजरात बाबासाहेबांना अभिवादन करत होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे