भिवंडी, ११ जुलै २०२३ : मुसळधार पावसामुळे बंजार पट्टी नाका, धामणकर नाका उड्डाणपुलासह शहरातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांची होणारी अडचण भिवंडी महापालिका प्रशासनासमोर मांडण्यात आली. महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या सूचनेवरून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील उड्डाणपुलावर असलेल्या सर्व खड्डयांसहित, प्रमुख रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
गेल्या १५-२० दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील जीवघेण्या खड्डयात पडून दुचाकीस्वार व दुचाकीस्वारांचे हातपाय मोडत होते. भिवंडी शहरातील सर्वच उड्डाणपूल व प्रमुख रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे आणि शहरातील अवजड वाहतूक यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
रस्त्यांवरील खड्यांची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजवण्याचे निर्देश दिले. आयुक्त म्हसाळ यांच्या सूचनेनंतर पालिका अधिकाऱ्यांच्या पथकाने बंजारपट्टी नाका, धामणकर नाका उड्डाणपुलासह शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या खड्डे दुरुस्तीच्या कामामुळे, नागरिकांना खड्डयातून वाहने चालवण्यापासून आणि वाहतूक कोंडीपासून सुटका होण्याची आशा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड