भोसरीत ‘वस्ताद’ कोण? भाजपसमोर आव्हान, महाविकास आघाडीला संधी!

आगामी महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भोसरी विधानसभा मतदारसंघातील लढत यंदा अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी एकहाती सत्ता मिळवत तब्बल ३३ नगरसेवक निवडून आणले होते आणि मतदारसंघाला दोन महापौर, दोन स्थायी समिती अध्यक्षपदांची संधी मिळाली. मात्र, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत आणि भाजपसमोर मोठी अंतर्गत आव्हाने उभी राहिली आहेत.

दुसरीकडे, राज्यातील सत्तांतरानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेला (ठाकरे गट) पुन्हा एकदा ताकद दाखवण्याची मोठी संधी आहे. महाविकास आघाडीने तगडे उमेदवार दिल्यास ही लढत अटीतटीची होईल. कारण शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसकडे अल्पसंख्याक आणि कामगार मतदारांचा स्थिर जनाधार आहे. राज्यातील फुटीनंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट), ठाकरे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र येत असल्याने महाविकास आघाडीला बळ मिळाले आहे.

भोसरीमध्ये आता चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महाविकास आघाडी अशी ही लढत रंगणार आहे. राष्ट्रवादीतून मंगला कदम, योगेश बहल, अजित गव्हाणे हे दिग्गज, तर भाजपमधून सीमा सावळे, एकनाथ पवार यांसारख्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रवी लांडगे यांनी मशाल हाती घेतल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई कोणाच्या पथ्यावर पडेल, याची चर्चा आहे. या निवडणुकीत नवमतदार महत्त्वाचा ठरणार आहे, ज्यांना जुन्या समीकरणांपेक्षा नेत्यांची कामगिरी आणि प्रतिमा अधिक महत्त्वाची वाटते. मतदारसंघातील विकासकामे आणि नेतृत्वाची कार्यक्षमता हाच निर्णायक घटक ठरेल. त्यामुळे भोसरीचा ‘वस्ताद’ कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे