Power Crisis Cripples Bhosari MIDC Small Industries: भोसरी एमआयडीसी परिसरातील लघुउद्योजक गेल्या काही दिवसांपासून विजेच्या सततच्या लपंडावामुळे पुरते हवालदिल झाले आहेत. शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन दिवस वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने, उद्योजकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. यात सर्वाधिक फटका प्लास्टिक उद्योगांना बसला असून, एका उद्योगाला सरासरी दीड लाख रुपयांचा फटका बसल्याचे समोर आले आहे.
कामगार बसून, उत्पादन ठप्प;
दिवसभरात तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने, अनेक उद्योगांची संपूर्ण शिफ्ट वाया गेली. “सलग दोन दिवस विजेच्या लपंडावाने संपूर्ण शिफ्ट वाया गेल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागला. शिवाय उत्पादन ठप्प झाल्याने सरासरी दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले,” अशी माहिती श्री जय अंबे एंटरप्रायझेसचे नितीन देवकर यांनी दिली. श्री साई एंटरप्रायझेसचे वैभव जगताप यांनीही, सततच्या वीजपुरवठ्यामुळे टेस्टिंगचे काम बाधित होत असल्याचे सांगितले.
महावितरणच्या ‘मलमपट्टी’ मुळे संताप;
महावितरणकडून केवळ तात्पुरते उपाय केले जात असल्याने, मूळ समस्या सुटत नसल्याची तक्रार लघुउद्योजकांकडून केली जात आहे. पिंपरी चिंचवड महिला लघु उद्योजक संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी, “रोजच्या विजेच्या लपंडावामुळे वेळेत उत्पादने देता येत नाहीत, ज्यामुळे अनेक कंपन्यांना नाहक दंडाचा भुर्दंड बसतो. याची भरपाई महावितरण करणार का?” असा संतप्त सवाल विचारला आहे.

महावितरणचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २२० केव्ही उपकेंद्रातील ‘सीटी’ फुटल्याने, तर शनिवारी दोन ‘पीन इन्सुलेटर’ फुटल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता. जुनी यंत्रणा बदलून नवीन जीआयएस प्रणालीचा वापर करण्याची मागणी विद्युत संनियंत्रण समितीचे माजी सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे












































