बिबट्याच्या दर्शनाने उजनी पांडुरंग क्षेत्रात खळबळ….!

इंदापूर, २२ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रात असणा-या भावडी, चांडगाव, वरकुटे बु. आणि चितळकरवाडी या भागात बुधवारी( दि.२२) रोजी बिबट्याचे दर्शन झाले.त्यामुळे उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळी शेतक-यांच्या शेळीचा फडशा बिबट्याने पाडला आहे. त्यामुळे  ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले.

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात असणा-या भावडी, चांडगाव, वरकुटे बुद्रूक, चितळकरवाडी या गावातील ग्रामस्थांनी स्वतः बिबट्या पाहिल्याचे म्हटले आहे. ऊस प्रचंड असणा-या या क्षेत्रात बिबट्याने तळ ठोकला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बुधावरी सकाळी भावडी येथील शेतकरी सोमनाथ मदने यांच्या घरासमोरच्या पटांगणात असणा-या शेळीचा बिबट्याने फडशा पाडला असल्याचे सांगण्यात आले असून आगोती क्रमांक १ चे शिवाजी गोळे, भावडीचे सोमा मदने, वरकुटे बु. चे प्रतापराव फाळके, शिवाजी पाडूळे, चितळकरवाडीचे वैभव चितळकर या ग्रामस्थांनी आपण प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याचे म्हटले आहे. शिवाजी गोळे यांनी बिबट्याचे ठसे शेतात असल्याचे सांगितले.

याबाबत इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना बिबट्या नदीकाठच्या गावात आला असल्याची माहिती दिली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर हे क्षेत्र कौठळी वनपालच्या कार्यक्षेत्रात येत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी या भागातील वनपाल यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.

याविषयी माहिती घेण्यासाठी वनविभाग अधिकारी राहुल काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही फोन उचलला नाही. बिबट्यांची भिती निर्माण झाली आहे आजच्या बिबट्याच्या भीतीमुळेच ग्रामस्थ आपला जीव मुठीत धरून आहेत. कुणी अधिकारी या भागाकडे अद्याप आला नाही. आता आपलं काही खरं नाही अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकारी यांनी तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा