कानपूर मध्ये मोठी दुर्घटना, तलावात बुडाली ट्रॅक्टर-ट्रॉली, ११ मुलांसह २६ भाविकांचा मृत्यू

कानपूर, २ ऑक्टोंबर २०२२: कानपूरमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात अनेक कुटुंबांच्या आनंदाचे काही मिनिटांतच शोकात रूपांतर झाले. फतेहपूरच्या चंद्रिकादेवी मंदिरात दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या अनेक कुटुंबीयांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.

कानपूरचे जिल्हा दंडाधिकारी विशाखजी यांनी २६ यात्रेकरूंच्या मृत्यूची पुष्टी केलीय. जखमींवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं. कानपूरच्या डीएमनेही अपघाताची चौकशी जाहीर केलीय. त्याचवेळी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू होतं. मदत आणि बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) जवानांची मदत घेण्यात आली.

कानपूर पोलिसांनी मदत आणि बचाव कार्याबद्दल ट्विट केलं आणि सांगितलं की, पोलीस प्रशासनासह पीएसी आणि एसडीआरएफ बचाव कार्यात गुंतले आहेत. अपघातातील जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी कानपूरचे पोलीस आयुक्त रुग्णालयात पोहोचले आणि उपचाराच्या व्यवस्थेचाही आढावा घेतला.

भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रितपणे तलावात उलटली, त्यानंतर त्यातील बहुतांश लोक त्याखाली गाडले गेल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे, तर ११ मुलांचाही या अपघातात मृत्यू झालाय. त्याचबरोबर चार गंभीर जखमी मुलांना कानपूरला रेफर करण्यात आलंय.

५० हून अधिक जखमी

कानपूरच्या घाटमपूर भागात ही घटना घडली आहे. चंद्रिका देवीचं दर्शन घेऊन हे लोक परतत होते. या घटनेत ५० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. ही माहिती पोलिस प्रशासनाला मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने तेथे पोहोचून मदतकार्य सुरू केलं. जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा