बिहार, १४ ऑगस्ट २०२२: बिहारमधील राजकीय गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाहीये. अलीकडेच नितीशकुमार यांनी भाजपशी संबंध तोडून राजदसोबत बिहारमध्ये सरकार स्थापन केलं. अशा परिस्थितीत जिथं नितीश पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले, तिथं तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं. पण हे प्रकरण इथेच संपलं नाही, आता बिहारमध्येही नव्या मंत्रिमंडळाबाबत वाद सुरू आहे. त्यामुळं एनडीएला लवकरच आणखी एक धक्का बसणार असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील एनडीएचे तीन खासदार जेडीयू आणि आरजेडीला पाठिंबा देऊ शकतात. हे तीन खासदार लोक जनशक्ती पक्षाच्या पारस गटाचे आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांनी एनडीएसोबत राहणार असल्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत खगरियाचे खासदार मेहबूब अली कैसर आरजेडी, आणि वैशालीच्या खासदार वीणा देवी आणि नवादाचे चंदन सिंह जेडीयूमध्ये प्रवेश करू शकतात, असं मानलं जात आहे.
२०१९ मध्ये लोक जनशक्ती पक्षाचे ६ खासदार विजयी झाले. गेल्या वर्षी लोक जनशक्ती पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष चिराग आणि पारसमध्ये फुटला. पारससोबत ५ खासदार होते तर चिराग एकटे होते. आता अशी बातमी आहे की जमुईचे खासदार चिराग, हाजीपूरचे पारस आणि समस्तीपूरचे राजकुमार वगळता सर्व तीन खासदार NDA सोडणार आहेत, जे एक कुटुंब आहेत.
तथापि, या प्रकरणात, केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांच्या नेतृत्वाखालील एलजेपीमधील खासदार तुटल्याची बातमी अफवा असल्याचं सांगण्यात येत आहे. पशुपती गटाच्या वैशालीच्या खासदार वीणा देवी यांनी पक्षातील फुटीला चुकीचं म्हटलंय. मी NDA मध्ये होते, NDA मध्ये आहे आणि NDA मध्येच राहणार असल्याचं त्या म्हणाल्या.
याशिवाय दुसरे खासदार चंदन सिंह यांनीही नितीश यांच्यासोबत जाण्याच्या वृत्ताला अफवा असल्याचं म्हटलंय. जेडीयू एनडीएपासून वेगळे होत असल्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, त्यांना पाहिजे तिथं जावं. मात्र आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि राहू.
नितीश विरोधात भाजपचा मोर्चा
दुसरीकडं, बिहारमध्ये भाजप नेत्यांनी नितीशकुमार आणि महाआघाडीविरोधात आघाडी उघडलीय. बेगुसरायमध्ये खासदार गिरीराज सिंह यांनी तेजस्वी आणि नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांच्यासोबत झालेल्या आंदोलनादरम्यान गिरीराज सिंह म्हणाले की, अतिमहत्त्वाकांक्षेमुळं नितीश कुमार यांना वाटत होतं की काही लोकांच्या सांगण्यावरून ते आगामी काळात पंतप्रधान होऊ शकतात. इतिहास साक्षी आहे की नितीशकुमार हे केवळ भाजपमुळेच मुख्यमंत्री झाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे