उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदे गटनेते, चौधरींची मान्यता रद्द, 16 आमदारांवर टांगती तलवार

मुंबई, 4 जुलै 2022: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत 39 आमदार फोडले आणि भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केलं. यानंतर काल भाजपचे नार्वेकर यांना सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 39 आमदार फोडले तर उद्धव ठाकरे यांच्याकडं 16 आमदार राहिले आहेत. काल मतदान होताना एकनाथ शिंदे गटाकडून या 16 आमदारांनी व्हिप न पाळल्यामुळं कारवाई करण्यात यावी असं पत्र अध्यक्षांना दिलं. तर शिवसेनेकडूनही 39 आमदारांवर कारवाई करण्यासाठी उपाध्यक्षांना पत्र देण्यात आलं.

मात्र या सर्व घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आलीय. विधीमंडळ सचिवालयाने एक परिपत्रक जारी करत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटातील इतर आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडं 16 आमदार शिल्लक आहेत. त्यात आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश आहे. संबंधित आमदारांनी काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेला पक्षाचा व्हीप पाळला नाही. त्यामुळे या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी नोटीस जारी केली, तर कायद्यानुसार आदित्य ठाकरेंसह उर्वरित 15 आमदार निलंबित होऊ शकतात, अशी माहिती मिळत आहे.

विशेष म्हणजे अजय चौधरी यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. भरत गोगावले हेच शिंदे गटाचे प्रतोद असणार आहेत. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना पुढे काय पावलं उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेल्या सर्व आमदारांची कायदेशीरित्या मोठी अडचण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा