बिग बजेट असणारा ‘शक्तीमान’ लवकरच येणार, मुकेश खन्ना यांनी केली चित्रपटाची घोषणा

7

मुंबई ७ जून २०२३ : गेल्या वर्षी टीव्ही मालिका ‘शक्तीमानवर’ चित्रपट बनणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सोनी पिक्चर्सनेही टीझर जारी करून याची घोषणा केली होती. आता मुकेश खन्ना यांनी त्यांच्या यु-ट्युब चॅनेलवर त्याविषयी नवी माहिती दिली आहे. ते म्हणाले की हा चित्रपट लवकरच बनला जाणार असून तो बिग बजेट असणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे २०० ते ३०० कोटी रुपये खर्च होतील. मुकेश म्हणाले की, हा चित्रपट बनणार आहे आणि नक्कीच मी त्या चित्रपटाचा भाग असेल.

निर्माते सोनी पिक्चर्सने गेल्या वर्षी शक्तीमान चा टीझर रिलीज केला होता. दूरदर्शनवर हिंदी मध्ये सुपरहिरो टीव्ही मालिका ‘शक्तीमान’ खूप गाजली. त्यात चांगलं आणि वाईट असा विषय असायचा. ‘शक्तीमान’ आपल्या शक्तीने नेहमी वाईट गोष्टींवर विजय मिळवायचा. मुकेश खन्ना यांनी साकारलेली ‘शक्तीमान’ ही व्यक्तिरेखा आजही लोकांना आठवते. आता रणवीर सिंह या चित्रपटात शक्तीमानची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.

पुढे याबाबत बोलताना मुकेश म्हणाले की, मी आताच या चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल खुलासा करू शकत नाही. मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंटरनॅशनल प्रोडक्शन कंपनीशी चित्रपटाचा करार झाला आहे असे कळते. स्पायडरमॅनसारखे चित्रपट बनवणाऱ्या ‘सोनी पिक्चर्स’ हे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा खूप मोठा चित्रपट असणार आहे, त्यामुळे याला बनायला वेळ लागेल. हा एक आंतरराष्ट्रीय चित्रपट असणार आहे. चित्रपटाबाबत अनेक प्रश्न आहेत. मी चित्रपटात दिसणार की नाही हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. योग्य वेळ आल्यावर मी सगळा खुलासा करेन.

भारतीय दूरदर्शन वाहिनीवर १९९७ पासून प्रसारित होणारा शक्तीमान हा शो १०४ भागांनंतर २००५ मध्ये अचानक बंद झाला. दूरदर्शनवर महाभारत आणि रामायण या मालिकानंतर शक्तीमानला सर्वाधिक पसंती मिळाली. या मालिकेला लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रियता मिळाली होती. हा शो बंद होण्यामागे मुकेश खन्ना आणि दूरदर्शन यांच्यात पैशावरून वाद झाला, हे कारण नंतर समोर आले. दर शनिवारी सकाळी आणि मंगळवारी रात्री शक्तीमान यायचा. नंतर रविवारीही त्याचे प्रसारण सुरू झालेले.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा