नवी दिल्ली, ६ जानेवारी २०२३ : दिल्लीत एमसीडी निवडणुकीनंतर आज म्हणजेच ६ जानेवारी २०२३ रोजी महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. यासोबतच उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांचीही निवड होणार आहे. मतदानापूर्वी नगरसेवकांना शपथ घ्यावी लागते. मात्र त्यापूर्वीच आपच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, सभागृहात भाजप आणि आप नगरसेवक एकमेकांशी भिडले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नामनिर्देशित नगरसेवकांच्या शपथविधीबाबत दिल्ली महापौर निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वी नागरी केंद्रात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
दरम्यान, या प्रकारामुळे एमसीडी सभागृहाचे कामकाज स्थगिती करण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाचे नगरसेवक प्रवीण कुमार म्हणाले, भाजपचे नेते महापालिकेत गुंडागिरी करीत आहेत, निवडून आलेल्या नगरसेवकाच्या अगोदर स्वीकृत सदस्यांना शपथ दिली जात आहे. आम्ही जेव्हा याला विरोध केला तेव्हा त्यांनी गोंधळ केला आहे.
दरम्यान, निवडणूक अधिकारी सत्या शर्मा यांनी सांगितले की, सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडावे, यासाठी मी अनेकवेळा शांत बसण्याचे आवाहन केले आहे तरी देखील गोंधळ सुरुच आहे. हे शांत नाही झाले तर आम्ही पुढच्या तारखेची वाट पाहू असे म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.