राहुल गांधी यांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक; भारत जोडो यात्रेत तरुणाने तोडले सुरक्षाकवच

होशियारपूर, १७ जानेवारी २०२३ : पंजाबमधील होशियारपूरमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मंगळवारी भारत जोडो यात्रा सुरु झाली. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. यात्रेमध्ये राहुल गांधी चालत होते. यावेळी अचानक एक व्यक्ती सुरक्षा भेदत राहुल गांधींजवळ पोहोचला यावेळी त्याने राहुल गांधींची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.

तरुण आपल्याकडे येत असल्याचे समजताच राहुल गांधी यांनी त्याला बाजूला केले. त्यानंतर सुरक्षा रक्षक तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला दूर केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या प्रसंगानंतर राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सुरक्षा एजन्सींकडून राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. एजन्सींच्या मते राहुल गांधींच्या काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान मोठी चूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहुल गांधींना काश्मीरमध्ये काही ठिकाणी न फिरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा