संगमेश्वर, २४ ऑगस्ट २०२१: दिवसभराच्या हाय व्होल्टेज ड्रामा नंतर अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल राणेंवर राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार कारवाई करत रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक करुन त्यांना नाशिक पोलिसांकडे सुपूर्द केलं. त्यानंतर नारायण राणे स्वत: बाहेर पडले आणि आपल्या गाडीत बसले. त्यानंतर नाशिक पोलीस राणेंना घेऊन नाशिकच्या दिशेनं रवाना झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणे जिथे थांबले होते, तिथे पोहोचले. राजशिष्टाचाराचे सर्व उपचार पाळल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटक केली. राणेंना रत्नागिरी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर कागदपत्रांचं सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे.
राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नारायण राणे यांच्या वकिलांना दिले आहेत. त्यामुळे तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. संगमेश्वरच्या गोळवलीमध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे