पुणे, १ सप्टेंबर २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांकडून ही माहिती मिळाली आहे. पीएम मोदी पुण्यातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून चाचपणी केली जात असल्याचे राजकीय सुत्रांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवणे हे भाजपसाठी सोपे मानले जात आहे. काही सर्व्हेक्षणातून भाजपची महाराष्ट्रात पिछेहाट होण्याची शक्यता समोर आल्यानंतर भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. जर पीएम मोदी पुण्यातून लढले तर पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर त्याचा प्रभाव जाणवेल, अशी रणनिती भाजपने आखली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक भाजपसाठी तेवढी सोपी नसल्याचे काही सर्व्हेतून समोर आले आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटर्सच्या ताज्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला केवळ २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ‘इंडिया’ आघाडीला २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. अशा स्थितीत ताज्या सर्वेक्षणातून भाजपची पिछेहाट होणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर