जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश, अवंतीपोरा-शोपियान येथून ३ दहशतवाद्यांना केली अटक

जम्मू-काश्मीर, ६ मे २०२३: जम्मू-काश्मीर पोलिसांना काल मोठे यश मिळाले. त्यांनी अवंतीपोरा आणि शोपियान येथून तीन दहशतवाद्यांना अटक केली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळे जप्त करण्यात आले. विशिष्ट माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, शोधमोहीम दरम्यान दोन दहशतवाद्यांना अवंतीपोरा येथून तर एकाला शोपिया येथून अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अवंतीपोरा आणि शोपियान येथून अटक करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांची नावे बशीर अहमद, गुलजार अहमद आणि मोहम्मद असगर दार अशी आहेत. हे तिघेही जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून त्यासाठी काम करतात. त्यातले दोन दहशतवादी बशीर अहमद आणि गुलजार अहमद हे अवंतीपोरा येथील त्रालमध्ले रहिवासी आहेत. तर मोहम्मद असगर दार हा शोपियानचा रहिवासी आहे. तीघांनाही सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

या तीन दहशतवाद्यांकडून १ एके-५६, २ एके मॅगझिन, ५६ एके जिवंत काडतुसे, ३ पिस्तूल, ६ पिस्तुल मॅगझिन, २४ पिस्तुल गोळ्या यासह अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. तीन्ही दहशतवाद्यांविरोधात त्राल पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा