जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; बालाकोटमध्ये दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर, ८ जानेवारी २०२३ : जम्मू-काश्मीरमधील बालाकोटमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. व्हाईट नाईट कॉर्प्सने सांगितले, की डांगरी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. बालाकोटमधील सीमेवरील कुंपणावर तैनात असलेल्या दक्ष जवानांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारले आहे. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून, कारवाई सुरू आहे.

राजौरीतील डांगरी भागात झालेल्या टार्गेट किलिंगनंतर जम्मू विभागात सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. सीमेवरही ‘बीएसएफ’ने ऑपरेशन सरद हवा सुरू केले आहे. दिवस असो वा रात्र बीएसएफ २४ तास सीमेच्या सुरक्षेत गुंतलेली असते. त्याचबरोबर सांबा प्रशासनाकडून सीमेच्या एक किलोमीटर परिघात रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

राजौरी बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या सात झाली आहे
जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या एका जखमीचा मृत्यू झाला आहे. आता या हल्ल्यातील एकूण मृतांची संख्या ७ वर गेली आहे. उल्लेखनीय आहे, की १ जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी डांगरी, राजौरी येथे घरांमध्ये घुसून गोळीबार केला होता, ज्यामध्ये ४ लोकांचा जागीच मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी झालेल्या IED स्फोटात २ लोक ठार झाले होते आणि ९ लोक जखमी झाले होते. जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये रात्री उशिरा हा मृत्यू झाला.

२०२२ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये १७२ दहशतवादी मारले गेले
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी २०२२ हे वर्ष काश्मीर प्रदेशात दहशतवादविरोधी कारवायांमध्ये अत्यंत यशस्वी असल्याचे वर्णन केले आहे. पोलिसांनी सांगितले, की, काश्मीर खोऱ्यात ९० हून अधिक ऑपरेशनमध्ये १७२ दहशतवादी मारले गेले आहेत. काश्मीर पोलिसांनी माहिती दिली, की २०२२ या वर्षात काश्मीरमध्ये एकूण ९३ यशस्वी चकमकी झाल्या, ज्यामध्ये ४२ परदेशी दहशतवाद्यांसह १७२ दहशतवादी मारले गेले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा