मुंबई, १९ मे २०२३: बिग बॉस सीझन ७ मध्ये एका डायलॉगची खूप चर्चा झाली आणि तो म्हणजे एजाज खानचा ‘एक नंबर’. सलमान खानच्या शोमधून एजाजला घरोघरी ओळख मिळाली. पण २०२१ मध्ये एजाजला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) एजाजला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले. अभिनेत्याजवळ अल्प्राझोलम नावाच्या औषधांच्या ३१ गोळ्या सापडल्या.
एजाजकडे सापडलेल्या गोळ्यांचे वजन ४.५ ग्रॅम होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. एजाज खान गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कैद होता. एजाज खानवर एनसीबीने ड्रग्ज तस्कर शादाब फारूक शेख ऊर्फ शादाब बटाटा यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. कोर्टात एजाजवर आरोप करताना असेही सांगण्यात आले की,तो फक्त ड्रग्जच खरेदी करत नाही तर त्याचे सेवनही करतो.
मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एजाजला जामीन मिळाला आहे. एजाजच्या कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा आहे. अभिनेत्याचे कुटुंब दोन वर्षांपासून त्याच्या जामिनासाठी खटला लढवत होते आणि याचिका दाखल करत होते. पण २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा जामीन स्पष्टपणे नाकारला. एजाजच्या कुटुंबीयांची याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले होते की, अभिनेत्यावर दाखल केलेल्या आरोपांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड