नवी दिल्ली, ४ फेब्रुवारी २०२३ :मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांचा चपाती बनवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात बिल गेट्स शेफ इटान बर्नाथ सोबत आहेत आणि ते चमच्याने पीठ मळताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये गेट्स चपाती लाटताना आणि नंतर ही चपाती तूप लावून खातानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ शेफ ईटन बर्नाथ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रतिक्रिया आली आहे.
- काय म्हणाले पंतप्रधान मोदी ?
चपाती बनवण्याच्या गेट्सच्या प्रयत्नांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्कृष्ट, भारतात बाजरीचे देखील अनेक पदार्थ आहेत, जे तुम्ही बनवू शकता. आपल्या ट्विटद्वारे पंतप्रधानांनी मायक्रोसॉफ्टच्या संस्थापकांना बाजरीच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांनी या ट्विटमध्ये स्मायली इमोजीचाही वापर केला आहे.
- शेफ बर्नाथने शेअर केला व्हिडिओ –
विशेष म्हणजे, ईटन बर्नाथ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “@BillGates आणि मला एकत्र भारतीय ब्रेड (चपाती) बनवताना खूप मजा आली. मी नुकतेच बिहार, भारतातून परत आलो, जिथे मी एका शेतकऱ्याला भेटलो. मी त्यांचा खूप आभारी आहे. येथील “दीदी की रसोई” कँटीनच्या स्त्रियांमुळे मी चपाती बनवायला शिकू शकलो, असे म्हटले आहे.
दरम्यान, बिल गेट्स यांनीही भारतीय चपातीचे ‘छान आहे! खूप स्वादिष्ट…’ अशा शब्दांत कौतुक केले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.















































