नागपूरमधील अंबाझरी तलावाची जैवविविधता धोक्यात

28

नागपूर, १ ऑगस्ट २०२३ : अंबाझरी तलावात गेल्या काही दिवसांत इकोपीया प्रकारातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यामुळे शहरांचे वैभव असलेल्या अंबाझरी तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. आय लव्ह नागपूर असे फलक असलेल्या ठिकाणी अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या नागपूरकरांनी देखील याबाबतीत चिंता व्यक्त केली आहे.

स्वामी विवेकानंद स्मारक परिसरात सेल्फीसाठी होणाऱ्या गर्दीतही, पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब असलेली ही गोष्ट चर्चेचा विषय झालीय. अंबाझरीमध्ये पोहणाऱ्या व परिसरात भ्रमंती करणाऱ्या नागरिकांनी ही धोकादायक जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. तलावामध्ये जलपर्णी झपाट्याने वाढत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष न दिल्यास लवकरच ही वनस्पती संपूर्ण तलाव व्यापून टाकेल असे नागरिकांना वाटत आहे.

महापालिकेच्या वतीने हे काम तातडीने करणे जरुरीचे आहे. अन्यथा लवकरच अंबाझरी तलाव दिसेनासा झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा एका प्रेक्षणीय तलावाचे संरक्षण करावे अशी मागणी नागरिकांकडुन केली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर