चंडीगढ़, ५ जानेवारी २०२१: हिमाचल प्रदेशात लोक कोरोना सोबत युद्ध लढत असतानाच आता बर्ड फ्लूचे आगमन झाले आहे. या आजारामुळे कांगड़ाच्या पोंग तलावात १७०० प्रवासी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या पक्ष्यांमध्ये एच ५ एन १ विषाणू आढळून आला आहे जो बर्ड फ्लू असल्याची पुष्टी करतो.
स्थानिक प्रशासनाने पोंग धरणात मृत आढळलेल्या पक्ष्यांचा नमुना भोपाळला पाठविला. येथून या पक्ष्यांचा तपास अहवाल सकारात्मक आला आहे. वनविभागाचे म्हणणे आहे की, एवढ्या मोठ्या संख्येने पक्ष्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले होते. भोपाळच्या अहवालात, सर्व पक्ष्यांमध्ये एच ५ एन १ एव्हीयन इन्फ्लूएंझा विषाणू आढळले आहेत.
या स्थलांतरित पक्षांसाठी एक आरक्षित ठिकाण हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलापासून ३०० किमी अंतरावर असलेल्या कांगड़ाच्या पोंग जलाशयात बनविण्यात आले आहे. दरवर्षी सायबेरिया आणि मध्य आशियाच्या थंड प्रदेशातून कोट्यावधी पक्षी हिवाळ्यात येत असतात आणि फेब्रुवारी – मार्च पर्यंत राहतात. यानंतर हे पक्षी पुन्हा माघारी जातात.
यावर्षी आतापर्यंत अवघ्या काही दिवसांत १,७०० पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने या जलाशयाभोवती चिकन, अंडीसह कुक्कुटपालन उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. पोंग तलावाच्या एक किलोमीटरच्या परिघात येणारा परिसर हा सतर्क विभाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाने पर्यटकांना या भागात जाऊ नका असे सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे