पक्षिविश्व- डोंबारी चिमणी (ashy crowned sparrow lark)

डोंबारी चिमणी हा माळरानावर आढळणारा छोटासा पक्षी आहे. हा पक्षी उंच आकाशात उडत जातो आणि पंख मिटवून जमिनीकडे सरळ सूर मारतो तसेच हवेत वेगवेगळ्या पद्धतीने वर खाली उडतो, म्हणून या पक्ष्याला डोंबारी हे नाव पडले आहे. याला इंग्लिशमध्ये  ॲशी क्राउन्ड स्पॅरो लार्क किंवा  ब्लॅकबेलीड फिंच लार्क अशी नावे आहेत. या पक्षाच शास्त्रीय नाव ‘एरेमोप्टेरिक्स ग्रीसिया’ हे आहे.

साधारण चिमणीएवढया असलेल्या या पक्ष्याचा रंग, वरून मातकट तपकिरी आणि खालून काळा असतो. डोकं राखट रंगाचं तर चोचीपासून डोळ्याच्या मागेपर्यंत काळा पट्टा असतो. नराच्या पोटाकडील भाग काळा असतो तर मादीच्या पोटाकडील भाग राखट रंगाचा असतो. याचा रंग रेताड जमिनीशी मिळताजुळता असल्याने हा चटकन दिसत नाही. हालचाल झाल्यावर किंवा उडाल्या वरच हा दिसतो.

ॲशी क्राउन्ड स्पॅरो लार्क चे मुख्य अन्न कीटक, चतुर, भुंगे, अळ्या आणि गवताच्या बिया हे आहे. या पक्ष्याचे घरटे माळावरच्या जमीनीवर दगडाला खेटून तयार केलेले असते. याचा आकार गवताच्या वाटीसारखा असतो. या घरटेवजा वाटीत, मादी परिसराशी मिळत्या-जुळत्या रंगांची अंडी घालते. या पक्ष्याची मादी साधारण चिमणीसारखी दिसते परंतु हा पक्षी सहसा माणसाच्या घराजवळ येत नाही.

चंडोल कुटुंबातले हे पक्षी जोड्यांनी किंवा छोट्या थव्यांमध्ये राहतात. यांच्या थव्यात शेकडो डोंबारी असतात. हवेत वरखाली यांच्या थव्याच्या कसरती, सकाळी आणि संध्याकाळी दिसून येतात. शेतीवाडीच्या आसपास राहत असल्याने यांना माणसांची बऱ्यापैकी सवय झालेली असते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा