हुदहुद पक्षी दिसायला खूप सुंदर आहे. त्याच्या डोक्यावर असलेल्या मुकुटामुळे तो लोकांना आकर्षित करतो. हुदहुद पक्ष्याच्या सुमारे सात प्रजाती जगात आढळतात. हा पक्षी आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडात आढळतो. भारतात हा सर्वत्र आढळतो. हुदहुदच्या मुख्य प्रजातींमध्ये आफ्रिकन हुदहुद, युरेशियन हुदहुद आणि मादागास्कर हुदहुद यांचा समावेश होतो. हुदहुदला इंग्रजीत Hoopoe (हुपो) Bird म्हणतात. तो “उप पू ओप ओप” असा आवाज करतो, त्यामुळे त्याचे इंग्रजी नाव ‘हूपो’ असे पडले.
हुदहुद पक्ष्याचा आकार साळुंकी पक्षाच्या आकाराएवढा आहे. या पक्ष्याची लांबी २५ ते ३० सें.मी.आहे. हुदहुदचे वजन ८० ते ९० ग्रॅम दरम्यान असते. हुदहुद पक्ष्याचे मुख्य खाद्य म्हणजे कीटक, लहान सरपटणारे प्राणी, बेडूक, गोगलगाय, गांडूळ इत्यादी आहे. हा पक्षी बिया आणि फळे देखील खातो. याचे दुसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चोच. ही चोच लांब व वक्र असते त्यामुळे ती जमिनीतील किडे सहज टिपू शकते. चोचीचा रंग काळसर असुन त्याची पिसे रंगीबेरंगी असतात. हुपोच्या शरीराचा मुख्य रंग तपकिरी बदामी आहे. त्याच्या पंखांवर आणि शेपटीवर काळे पांढरे पट्टे आहेत. या पक्ष्यांची घरटी झाडांच्या कपारीत, ढोलीत किंवा पोकळीत बनवली जातात. हे पक्षी घरट्याचे प्रवेशद्वार खूपच लहान ठेवत असल्यामुळे इतर भक्षक प्राणी पक्षी घरट्यात प्रवेश करू शकत नाहीत.
नर आणि मादी हुदहुद जवळजवळ समान दिसतात. प्रजननासाठी थंड हवामानात मादी हुदहुद आठ ते दहा अंडी घालते. मादी हुदहुद एकटीच अंडी सांभाळते. या काळात अन्नाचे व्यवस्थापन करणे हे नराचे काम असते. १५ ते २० दिवसांत अंडी उबतात. हुदहुद जास्त उंचावर उडत नाही. त्याची जोडी फक्त एका हंगामापुरती मर्यादित असते. तो आयुष्यभरासाठी जोडी बनवत नाही. हा पक्षी शांत स्वभावाचा असला तरी घरटय़ाला त्रास झाला की तो आक्रमक होतो. तो त्याच्या विशिष्ट भागावर वर्चस्व करून राहतो. दुसरा हूपो पक्षी त्या भागात आला की तो त्याला मारामारी करून पळवून लावतो. या पक्ष्याचे सरासरी आयुष्य १० वर्षे असते.
हुदहुदला बहुतेकदा एकटे राहणे आवडते, परंतु कधीकधी हा पक्षी जोडीदारासह दिसतो. नाकतोडे , झुरळे ,टोळ ,मुंग्या असे सर्व प्रकारचे किडे मटकावणारा हा पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे. विशेषतः तो शेतीला नुकसानकारक ठरणारे किडे खातो. शेतात मान खाली घालून घाईघाईत त्याच्या सुईसारख्या टोकदार चोचीने जमिन खोदून तो गांडूळ, किडे शोधत असतो. दिसायला हा सुतार पक्ष्यासारखा दिसतो, पण हा सुतार पक्षी नाही. हा पक्षी विशिष्ठ हालचाल करत वरखाली तरंगत उडतो. पंख पसरल्यावर हूपो खूपच मनमोहक भासतो.
हुदहुद हा इस्रायल देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. इस्लाम, ख्रिश्चन आणि ज्यू धर्मातही या पक्ष्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की हुदहुद पक्षी हजरत सुलेमानचा संदेशवाहक म्हणून काम करत असे. या पक्ष्याचा उल्लेख प्राचीन इजिप्तमध्ये, मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण आणि ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ बायबलमध्येही आढळतो.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.