कोतवाल हा आकाराने बुलबुलपेक्षा मोठा पक्षी आहे. कोळसा, कोतवाल, ‘पोलिस बर्ड’ अशी नावे असलेला हा पक्षी झाडावर, शेतात पाणी पडणाऱ्या ठिकाणच्या जवळील विजेच्या तारांवर बसून भक्ष्य पकडताना दिसतात. संपूर्ण भारतासह ईराण, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, चीन, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातही हा आढळतो. त्याच्या शेपटीसह शरीराची लांबी एक फुटापर्यंत असते. शेपटी लांब असून शेवटाकडे दुभंलेली असते. दुभांगलेले दोन भाग टोकाकडे बाहेर वळलेले असतात. चोच काळी असून तिच्या बुडाजवळ एक पांढरा ठिपका दिसतो. डोळ्यांचा रंग लाल आहे. नराच्या तुलनेत मादीचा काळा रंग कमी चमकतो.
कोतवाल हा कोष्ठपालाद्य (डायक्रुरिडी) या कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव डायक्रुरस माक्रोसर्कस असे आहे. त्याला इंग्रजीत Black Drongo असे म्हणतात. माळरानावर, शेतात, झाडाझुुपांमध्ये कोतवाल म्हणजेच ड्राँगो पक्ष्यांचा किडे पकडण्याचा खेळ कायम सुरु असलेला आपल्याला नेहमी दिसतो. म्हशीच्या पाठीवर ऐटीत बसून तिच्या पायाखालून उडणाऱ्या कीटकांवर तसेच शेताची मशागत करताना नांगर, कुळव चालतो तेव्हा किड्यांवर ताव मारताना या काळ्या पक्षास बऱ्याच वेळा आपण पाहिले आहे. या पक्ष्याला त्याच्या काळ्या कुळकुळीत रंगामुळे ‘कोळसा’ म्हणतात. शेताच्या बांधावरील वाळलेला काट्या- कुट्यांचा कचरा पेटविला जातो त्यावेळी त्या कचऱ्यातील कीटक जीवाच्या आकांताने बाहेर पडतात तेव्हाही, हा पक्षी त्यांच्यावर ताव मारायला तेथे हजर असतो.
कोतवाल हा घार, कावळा एवढेच नाही तर गरुडासारखे सुद्धा शिकारी पक्षी दिसताच चिरक्या आवाजाचा मोठा गलका करुन त्यांचा पाठलाग करत त्यांना हुसकावून लावतात. इतर पक्षांना ते सहसा त्रास देत नाहीत. या रक्षण करणाऱ्या गुणवैशिष्ट्यामुळेच कदाचित याला ‘कोतवाल’ हे नाव पडले असावे. विशेष म्हणजे शिकारी पक्षांपासून आपल्या पिलांचे आणि अंड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून चिमण्या, बुलबुल, कबुतरे आणि इतर काही पक्षी कोतवाल पक्षांच्या घरट्याच्या आसपास आपली घरटी बांधतात.
एप्रिल ते ऑगस्ट या विणिच्या काळात कोतवाल आपले आपले घरटे उंच झाडावरील फांद्यामध्ये बारीक काटक्यां व धाग्यांचा वापर करुन बांधतात. त्यात मादी एका वेळी तीन ते चार अंडी घालते. त्यानंतर नर आणि मादी मिळून अंडी उबवितात व पिलांचा सांभाळ करतात. सडपातळ बांध्यामुळे हा चपळ असतो. हवेत उडणाऱ्या कीटकांबरेबरच लहानलहान कीडे, आळ्या, असे त्याचे अन्न आहे. हे पक्षी एकट्याने किंवा लहान-मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.