तणमोर हा दुर्मिळ पक्षी जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा पक्षी साधारण ४५ सें.मी. आकाराचा, कोंबडीएवढा आहे.तणमोर पक्षाचे भारताचा पूर्वोत्तर भाग सोडून इतरत्र वास्तव्य आहे. भारतातील हा निवासी पक्षी असून, हा देशाच्या इतर भागात स्थानिक स्थलांतर करतो. तणमोर हे उंच गवताळ भागात आणि शेतामध्ये सहसा एकटे राहणे पसंत करतात.
तणमोरांच्या विणीच्या काळात नराच्या डोक्यामागील खालच्या बाजुने एक तुरा येतो तसेच त्याच्या पाठीकडून पिंगट काळा, पोटाकडे काळा, मानेवर आणि पंखात पांढरा रंग असा बदल होतो. एरवी नर-मादी दिसायला सारखेच असतात. मातकट रंग त्यावर तुटक काळ्या रेषा असलेले असे यांचे शरीर असते. यांचे शेपूट आखूड असते. या पक्ष्याच्या पायाला मागचे बोट नसते. गवताळ माळराने, सोबत कोरडवाहू शेती या सारख्या मिश्र ढिकाणी हा पक्षी राहतो. अत्यंत सावध, लाजाळू असल्याने क्वचितच दिसतो. नर विणीच्या हंगामात मादिला रिझवण्यासाठी साधारण ४ फुटांच्या उड्या मारतो, याच वेळी तणमोराचे नर दृष्टिपथात येतात. गवताचे कोंब, धान्य, कीटक हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.
जुलै ते ऑक्टोबर हा काळ तणमोर पक्ष्यांचा वीणीचा काळ असून गवताच्या रांजीत, शेतातील रोपांमध्ये मादी घरटे तयार करते आणि त्यात हिरवट-पिवळ्या रंगाची त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली ३ ते ४ अंडी देते. पिलांचे संगोपन करण्याची जबाबदारी एकटी मादी पेलते. वीण काळात नर मादीला आकर्षित करण्यासाठी आणि साम्राज्य निश्चितीसाठी एकाच जागेवर उंच उंच उड्या मारतो. नराच्या या सवयीमुळेच शिकाऱ्यांचे लक्षही त्याच्याकडे सहजपणे वेधले जाते. हे पक्षी अत्यंत दुर्मिळ झाले असून त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. गेल्या काही वर्षांत तणमोर खूपच कमी वेळा दृष्टीस पडला आहे.
तणमोर हा पक्षी जवळ जवळ नामशेष झालाय असा समज होता, मात्र काही स्वयंसेवी संस्थांनी २००१ पासुन आणि पुढे २०१४ पासुन महाराष्ट्र सरकारच्या राजीव गांधी विज्ञान व महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्पाअंतर्गत केलेल्या कामामुळे या पक्षाबाबत नवी माहिती मिळाली असुन, हा दुर्मिळ पक्षी आता महाराष्ट्रातील अकोला व वाशीम जिल्हातील गवताळ भाग, शेती या प्रकारच्या अधीवासात पुन्हा दिसू लागल्याचे कळते. या कामात स्थानिक फासेपारधी या आदिवासी समुहाचा मोठा सहभाग असुन त्यांनी या पक्षाच्या संवर्धनासाठी अकोला जिल्ह्यातील वडाळा या गावात गवत संरक्षणाचा महत्त्वाचा प्रयोग हाती घेतला आहे.
केवळ भारतातील काही राज्यांमध्ये अधिवास असलेल्या संकटग्रस्त तणमोर ( Lesser Florican) पक्ष्याला ‘सॅटलाईट टॅग’ लावून त्यांच्या शास्त्रोक्त अभ्यासाला सुरुवात झाली आहे. गुजरात वन विभागाच्या पुढाकाराने भावनगरमधील ‘ब्लॅकबक राष्ट्रीय उद्याना’त हा प्रयोग करण्यात आला आहे. याअंतर्गत दोन तणमोरांना टॅग लावण्यात आला असून यामाध्यामातून त्यांचे स्थलांतर आणि विणीव्यक्तिरिक्त त्यांच्या इतर अधिवास क्षेत्रांचा मागोवा घेतला जातोय. शास्त्रोक्त अभ्यासाच्या आधारे मिळालेल्या नव्या माहिती प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात तसेच औरंगाबादच्या फुलंब्री-सिल्लोड तालुक्यात तणमोर आढळल्याच्या नोंदी आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.